नोकियात मोठी नोकरकपात, 14000 कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकेकाळची जगातील सर्वात मोठी मोबाईल उत्पादक कंपनी नोकिया कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात करणार आहे. कंपनीने जागतिक स्तरावर सुमारे १४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी सुरू केली असून, याचा मोठा परिणाम नोकियाच्या हिंदुस्थानवर देखील होणार आहे.

‘मनीकंट्रोल’च्या अहवालानुसार, नोकिया आपल्या एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येत २० टक्क्यांनी कपात करणार आहे. सध्या नोकियाकडे जागतिक स्तरावर ७४,००० हून अधिक कर्मचारी आहेत. यापैकी 14 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, हिंदुस्थानात नोकियाचे मोठे जाळे असून येथे सुमारे १७,००० कर्मचारी कार्यरत आहेत.

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या मंदीचे सावट असून ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांसारख्या कंपन्यांनी आधीच हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यात आता नोकियाचीही भर पडली आहे. नोकियाच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानातील आयटी आणि टेलिकॉम क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. यामुळे हिंदुस्थानातील हजारो अभियंते आणि तंत्रज्ञांनांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात.