बोलीभाषेची समृद्धी – मुंबई किनाऱ्याची वाडवळी बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्णिका काकडे

वाडवळी भाषा ही मुख्यत महाराष्ट्रात उत्तर कोकणात बोलली जाते. ही भाषा देहेरी ते मुंबई गिरगावपर्यंत पसरलेल्या वाडवळ समाजाची बोलीभाषा आहे. ही भाषा कोकणी, पोर्तुगीज, फारसी आणि अरबी भाषेच्या मिश्रणातून तयार झाली असून, यात साधेपणा आणि गोडवा आहे. या बोलीत अनेक लोकगीते, शब्दकोश आणि ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा टिकून आहे. वाडवळी लोकगीतांमधून लोकजीवनाचे प्रतिबिंब उमटते. मौखिक परंपरेमुळे अजूनही ही लोकगीते टिकून आहेत.

वाडवळ ज्या बोलीतून त्यांचा व्यवहार करतात त्या बोलीला ‘वाडवळी’ म्हटले जाते. वाडवळी मराठीत लिंग, वचन, काल हा भेद पाळला जात नाही. या बोलीला प्रचलित असे व्याकरण नाही. मराठीतील स व श् या अक्षरांऐवजी वाडवळीत ह हे एकच अक्षर वापरले जाते. तसेच च चे रूपांतर स होते. या अनुसरून चणे ऐवजी सणे, समई ऐवजी हमई, शेण ऐवजी हेण असे म्हटले जाते. वाडवळी बोलीला वाडवळांची वस्ती असलेल्या परिसराच्या भौगोलिक परिस्थितीचा स्पर्श झालेला आहे. गुजरातला खेटून असलेला महाराष्ट्राचा उत्तर कोकण विभाग हा वाडवळीचा प्रदेश. त्यामुळे त्या बोलीत कितीतरी गुजराती शब्द सापडतात. वाडवळीत वापरले जाणारे सोके, ओव, बिजा, वागा हे शब्द गुजरातीशी साधर्म्य दाखवतात.

वाडवळी बोलीचे नाते मध्ययुगीन महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या मराठीशी आहे. या बोलीतील अनेक शब्द ज्ञानेश्वरी आणि एकनाथी वाडमयातही आढळतात. यादवकालीन वाङ्मयात आढळणारे शब्द इंगळ, ओखंद, माखी, वीख, आथी, केव यांसारखे वाडवळीत वापरले जातात. ज्ञानेश्वरीत पोखण, व्रेही, वीख, जंव-तंव, येक, येर यांसारखे शब्द जागोजागी आढळून येतात, ते वाडवळीत सर्रास वापरले जातात.

वाडवळीने स्वतचे असे बरेच शब्द वाडीव्यवसायामधून निर्माण केले आहेत. ते मराठीत इतरत्र सापडणे मुश्किल. वाडवळी हा शब्द पानवेलीच्या व्यवसायातून जन्माला आला आहे. वेडणं, पानं हडखणं, आडकी, खांडावण, हरळ, बिबला, ढाळणी, आवटर. वाडवळीचे स्वतचे असे काही शब्द आहेत- जसे, खोला (केळीचे पान), हायवेळ (सावली करणे), बावखल (लहान तळे), इरोळी (लहान टोपली), कुबाव (विहीर) इत्यादी. अलिकडे कथा, कविता आवर्जून वाडवळीत लिहिल्या जातात. वाडवळी साहित्य संमेलनेही आयोजित केली जातात.