जुन्या वैमनस्यातून गोळीबार केल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. या गोळीबारात कुख्यात गुंड ठार झाला आहे. हाजी सरवर असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. शहरातील बिनबा गेट परिसरातील शाही दरबार हॉटेलमध्ये ही घटना घडली. गेल्या दीड महिन्यातील जिल्ह्यातील गोळीबाराची ही सलग चौथी घटना आहे. भररस्त्यात घडलेल्या या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हाजीसह चंद्रपूर जिल्ह्यातील इतर गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सतत संघर्षाची स्थिती होती. त्यातूनच हा गोळीबार झाल्याचे समजते. आपल्या साथीदारांसह हाजी या हॉटेलमध्ये जेवायला आला असता अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर हाजीवर चाकूहल्लाही करण्यात आला. जखमी अवस्थेत हाजीला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर रुग्णालयात तणावाची स्थिती आहे. दरम्यान, हाजीवर गोळीबार करणाऱ्या पाचही आरोपींनी आत्मसमर्पण केल्याची माहिती मिळते.