
शहरातील न्युरानी कॉलनी येथे सायंकाळी कुख्यात गुंड सागर मोहळकरवर दुचाकीवरून आलेल्या एकाने गोळीबार करत सात राऊंड फायर केले. यात गुंड सागर याच्या अंगात चार गोळय़ा घुसल्या असून, तो गंभीर जखमी झाला आहे. याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली. गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
जामखेड शहरातील न्युरानी कॉलनी येथे आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडली. कुख्यात गुंड सागर मोहळकर हा नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. मोहळकरवर अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी वडिलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशन एनसी दाखल केली होती. तो नशेच्या आहारी असायचा, जामखेड परिसरात त्याची मोठी दहशत होती.
गोळीबाराच्या घटनेनंतर जामखेड पोलिसांनी ताबडतोब गुंड सागर याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला नगरला हलविण्यात आले आहे. त्याच्या अंगात चार गोळ्या घुसल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कुख्यात गुंड सागर मोहळकर असलेल्या 307 गुह्याबद्दल नाशिक मध्यवर्ती कारागृहात होता. तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दवाखान्याबाहेर मोठय़ा प्रमाणात गर्दी जमली होती.
























































