
सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ओपन एरामध्ये विजेतेपदांचे शतक साजरे करून सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडरर व जिमी कॉनर्स या महान खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळविले. त्याने जिनेव्हा ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत पोलंडच्या ह्युबर्ट हुरकाजचा पराभव करीत एटीपी किताबाचे शतक पूर्ण केले.
अमेरिकेचा माजी टेनिसपटू जिमी कॉनर्स यांच्या नावावर सर्वाधिक 109 एटीपी जेतेपदे आहेत. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर 103 किताबांसह दुसऱ्या, तर जोकोविच 100 किताबांसह तिसऱ्या स्थानावर आहे. जोकोविचने जिनेव्हा ओपन स्पर्धेच्या अंतिम लढतीत ह्युबर्ट हुरकाजचा 5-7, 7-6(7/2), 7-6(7/2) असा पराभव केला. पहिला सेट गमाविल्यानंतरही जोकोविचने टायब्रेकपर्यंत गेलेले पुढील दोन सेट जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. जोकोविचने 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अखेरचे विजेतेपद पटकाविले होते. त्याला गतवर्षी शांघाय स्पर्धेच्या फायनलमध्ये जॅनिक सिनरने, तर मार्चमध्ये मियामी स्पर्धेच्या फायनलमध्ये याकुब मेनसिकने हरविले होते. आता आजपासून सुरू झालेल्या फ्रेंच ओपनमध्ये कारकिर्दीतील 25व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदासाठी जोकोविच सर्वस्व पणाला लावताना दिसेल.