आता घरीच बनवा मेयोनीज, फ्रेश क्रीम आणि खूप काही..

फ्रेश क्रीम असो किंवा टोमॅटो सॉस, अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण घरात हमखास वापरतो. बाजारात मिळणाऱ्या या उत्पादनांमध्ये मात्र केमिकल्स अधिक प्रमाणात असल्यामुळे, ही उत्पादने आपल्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळेच आपण घरच्या घरी सुद्धा या वस्तू बनवू शकतो.

अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की आपण या गोष्टी खाणे बंद करावे का? तर तसे नाहीये… तुम्ही या गोष्टी घरी अगदी सहज बनवू शकता. ज्या दिसायला आणि चवीला अगदी बाजारातील पदार्थांसारख्याच असतील पण त्यात कोणतेही रसायन वापरले जाणार नाही. ज्यामुळे तुमच्या आरोग्यालाही नुकसान होणार नाही. जाणून घ्या घरच्या घरी हे पदार्थाच्या झटपट रेसिपीज

फ्रेश क्रीम

सर्वप्रथम 500 ग्रॅम दूध घ्या, ते उकळवून घ्या आणि नंतर त्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर घाला आणि दूध हळूहळू ढवळत राहा.

10 मिनिटे असेच राहू द्या. काही वेळाने दूधाचे चीज होईल. दूध चीज झाल्यानंतर, चीज आणि पाणी वेगळे करा.

आता काढलेले चीज एका ब्लेंडिंग जारमध्ये ठेवा आणि त्यात 200 ग्रॅम दूध घाला. 50 ग्रॅम बटर आणि अर्धा चमचा साखर मिसळा आणि ते मिक्स करा. मिश्रण केल्यानंतर, ते एका भांड्यात काढा आणि 30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. तुमची बाजारासारखी ताजी क्रीम तयार आहे.

मेयोनीज

घरी बाजारासारखे मेयोनीज बनवण्यासाठी, सर्वप्रथम 100 ग्रॅम काजू गरम पाण्यात उकळवून घ्या.

त्यानंतर काजू थंड करून घ्या. नंतर एका ब्लेंडिंग जारमध्ये 100 ग्रॅम पनीर , थंड केलेले काजू, काळी मिरी, मिठ, आणि 50 ग्रॅम दूध ( दूध गरजेनुसार वापरावे ) हे मिश्रण मिक्स करुन घेतल्यानंतर मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे.

त्यानंतर त्यामध्ये थोडे आंबटपणासाठी 2 चमचे लिंबाचा रस घाला. तुमचे बाजारासारखे मेयोनीज घरी तयार आहे, तेही तेल आणि अंड्यांशिवाय.

टोमॅटो सॉस

घरी बाजारासारखा टोमॅटो सॉस बनवण्यासाठी. एका पॅनमध्ये 1 किलो चिरलेले टोमॅटो, रंग येण्यासाठी 1 बीटचे तुकडे, 1 चिरलेला कांदा, अदकरचा तुकडा , 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या 1वाटी साखर, 3 चमचे व्हिनेगर, चवीनुसार मिठ आणि 2 ते 3 सुखी लाल मिर्ची हे सर्व मिश्रण नरम होईपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या.

हे मिश्रण शिजल्यानंतर ब्लेंडर मधून या मिश्रणाची पेस्ट बनवून घ्या आणि हे मिश्रण एका चाळणीतून गाळून घ्या.

मार्शमॅलो

घरच्याघरी मार्शमॅलो बनवण्यासाठी प्रथम मिक्सरमध्ये 2 चमचे साखर, दीड चमचा कॉर्नफ्लोअर घालून आयसिंग शुगर तयार करुन घ्या. मार्शमॅलो सेट करण्यासाठी एका केक कंटेनरमध्ये ( केक कंटेनर नसेल तर स्टील डब्बा वापरु शकता) थोडे तेल घालून पसवून घ्या.

त्यानंतर त्यावर आयसिंग शुगर सर्वत्र पसरवून घ्या. त्यानंतर एका बाउलमध्ये 2 चमचे जेलेटिन पावडरमध्ये 3 कप पाणी घालून भिजवून ठेवा. त्यानंतर एका पॅनमध्ये 1 कप साखर घेउन त्यामध्ये 1/4 कप पाणी घाला. मंद आचेवर साखर विरघळेपर्यंत ढवळून घ्या.

साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले जेलेटिन घाला आणि 2 मिनिटे ढवळून घ्या.नंतर मिश्रण एका भांड्यात काढून ते थंड करुन घ्या. आणि सॉफ्ट टेक्शर येईर्यंत फेटून घ्या. त्यानंर त्यामध्ये फ्लेवर साठी व्हेनिला इंसेस टाकून घ्यावे.

त्यानंतर पुन्हा एकदा 1 मिनिट फेटून घ्या. आयसिंग शुगर पसरवलेल्या कंटेनरमध्ये अर्धे मिश्रण घालून सेट करुन घ्या. त्यानंतर अर्ध्या मिश्रणात स्ट्रॉबेरी फ्लेवर घालून तेही कंटेनर मध्ये लेअर करा आणि त्यावर सर्वत्र आयसिंग शुगर पसरवून मिश्रण थंड होउ द्या. त्यानंतर ते हलक्या हातने बाहेर काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करुन सर्व्ह करा. तुमचा बाजारासारखा मार्शमॅलो तयार आहे.

बटर

बाजारासारखे बटर बनवण्यासाठी, प्रथम 300 ग्रॅम शुद्ध तूप घ्या. ते एका भांड्यात घ्या आणि त्यात 5-6 बर्फाचे तुकडे घाला. तूप आणि बर्फ 4-5 मिनिटे चांगले फेटा. त्यानंतर, त्यात चिमूटभर हळद पावडर घाला आणि पुन्हा 3 मिनिटे फेटा. तूप चांगले घट्ट झाल्यावर, बर्फाचे तुकडे काढून टाका. तुमचे बाजारासारखे बटर तयार आहे.