
पक्षाची कमांड कुणाच्या हातात असणार यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष तर सुनील तटकरे यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून हटवल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात पटेल आणि तटकरे यांच्या पदाचा कोणताही उल्लेख केलेला नसल्याने राजकीय वर्तुळात याबाबत तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.
राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, तर शिवाजीराव गर्जे खजिनदार असा दोनच पदांचा उल्लेख आहे. या पत्रात 14 पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे, मात्र त्यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नाही. या आधी अजित पवार यांच्या काळात निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिण्यात आले होते त्यामध्ये पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे त्यांच्या पदाचा उल्लेख होता. सुनेत्रा पवार यांच्या पत्रात पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख नसल्यामुळे या दोघांनाही पदावरून हटविल्याची चर्चा आहे.
यामुळे राजकीय खळबळ
जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होते तेव्हा निवडणूक आयोगाकडे पक्षाशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये कोण-कोण आहे? त्यांच्या नावाची यादीदेखील पाठवावी लागते.
त्यानुसार सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर आयोगाला एक पत्र पाठवण्यात आले. त्या पत्रामध्ये केवळ सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख करण्यात आला आहे.
सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली तेव्हाच सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती, मात्र त्यांच्या पदाचा पत्रात उल्लेख नसल्यामुळे एकच राजकीय खळबळ उडाली आहे.



























































