
बदलत्या जीवनशैलीमुळे हिंदुस्थानात साखर, मीठ व चरबीयुक्त पदार्थाचे सेवन जास्त प्रमाणात केले जात आहे त्यातच व्यायामाचा अभाव असल्याने शरीराचा आकार बदलत जात आहे. तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर पुढच्या दहा वर्षांत हिंदुस्थात हा जगातील सर्वाधिक लठ्ठ आणि जादा वजन असलेल्या मुलांचा देश ठरू शकतो, असा इशारा युनिसेफ इंडियाने दिला आहे.
‘युनिसेफ’च्या अहवालानुसार, 2030 पर्यंत हिंदुस्थानात सुमारे 27 दशलक्ष (2.7 कोटी) मुले आणि किशोरवयीन लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त असतील. हे जागतिक एकूण संख्येच्या 11 टक्के इतके आहे. युनिसेफ इंडियाच्या आहार विभागाचे प्रमुख मारी-क्लॉद डेसिले यांनी सांगितले की, वेळेत उपाययोजना केल्या तर हिंदुस्थान इतर देशांसाठी आदर्श ठरू शकतो. हिंदुस्थानात फिट इंडिया मूव्हमेंट, ईट राईट इंडिया, पोषण अभियान 2.0 यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, ‘युनिसेफ’च्या मते अजून ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. एकीकडे कुपोषण, तर दुसरीकडे लठ्ठपणा अशा त्रिगुणी पोषण-संकटाची स्थिती देशासमोर उभी आहे.