
न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने दुबळ्या झिम्बाब्वेचा अशरक्ष: फडशा पाडला आहे. न्यूझीलंडच्या दमदार खेळापुढे झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा आणि फलंदाजांचा निभाव लागला नाही. दुसऱ्या कसोटीत झिम्बाब्वेचा दुसरा डाव 117 धावांवर संपुष्टात आला आणि न्यूझीलंडने एक डाव राखून 359 धावांनी विजयी जल्लोष केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
पहिला कसोटी सामना न्यूझीलंडने जिंकला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा संघ त्याच जोशात मैदानात उतरला. न्यूझीलंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 601 धावांचा डोंगर झिम्बाब्वेपुढे उभा केला होता. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा पहिला डाव अवघ्या 127 धावांवर संपुष्टात आला. फॉलोओन पासून वाचण्यास झिम्बाब्वेला अपयश आलं आणि त्यांचा दुसरा डाव पुन्हा सुरू झाला. दुसऱ्या डावातही त्यांची गाडी फक्त 117 धावांपर्यंत पोहोचली आणि न्यूझीलंडने एक डाव राखून 359 धावांनी मोठा विजय साजरा केला. या विजयासह संघाने 2-0 ने मालिका सुद्धा जिंकली. न्यूझीलंडने आपल्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय साजरा केला तर, झिम्बाब्वेला सर्वात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
शुभमन गिलचा मैदानाबाहेरही बोलबाला! लिलावात जर्सीला सर्वाधिक 5.41 लाखांची बोली
कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासावर नजर टाकली तर सर्वात मोठ्या फरकाने इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 1938 साली पराभव केला होता. इंग्लंडने ऑस्ट्रेलिया एक डाव आणि 579 धावांनी धुळ चारली होती. तर या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 360 धावांनी 2002 साली पराभव केला होता. तर तिसऱ्या क्रमांकावर आता न्यूझीलंडचा समावेश झाला आहे. चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडिज असून त्यांनी टीम इंडियाचा एक डाव आमि 336 धावांनी 1958 साली पराभव केला होता.