अंबरनाथ, बदलापूरच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस, 190 जणांनी नोंदवला आक्षेप

अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचनांचा पाऊस पडला आहे. अंबरनाथमधील प्रभाग रचनेवर 108 तर कुळगाव-बदलापूरमधील प्रभाग रचनेवर 88 हरकती पडल्या आहेत. सर्वच पक्षांच्या इच्छुकांना आता फेररचनेची प्रतीक्षा आहे.

अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाने 18 ऑगस्ट रोजी जाहीर केली होती. त्यानंतर या प्रभाग रचनेवर 31 ऑगस्टपर्यंत सूचना आणि हरकती घेण्यात आल्या. अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक 89 प्रभागांत होणार आहे. त्यापैकी 88 प्रभाग हे दोन सदस्यीय तर एक प्रभाग हा तीन सदस्यीय असणार आहे. अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 88, 89, 15 आणि 16 या प्रभागांमधून हद्दींबाबत सर्वाधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर सोमवारपासून उपविभागीय अधिकारी व प्राधिकृत अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत सुनावणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

बदलापूरमध्ये 84 प्रभाग
कुळगाव-बदलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर एकूण 88 हरकती आणि सूचना आल्या आहेत. ही निवडणूक 84 प्रभागांसाठी होणार आहे. सर्वच प्रभागातून दोन नगरसेवक नगरपालिकेत जाणार आहेत. नागरिकांनी घेतलेल्या हरकतींची सुनावणी सुरू करण्यात आली आहे. काही हरकतींचे निराकरण थेट ‘स्पॉट’वर येऊन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.