यवतमाळ ते सोलापूर अंतर 500 कि.मी… अधीक्षक अभियंता 30 मिनिटांत हजर! मिंधे सरकारकडून हायस्पीड बदल्या

राज्यातील मिंधे सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा वेग हायस्पीड झाला आहे. सोलापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांची बदली झाली. त्यांच्या जागी यवतमाळ येथील अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे यांची नियुक्ती केली गेली. यवतमाळ ते सोलापूर हे अंतर सुमारे 500 कि.मी.चे आहे. मात्र धोत्रे अवघ्या 30 मिनिटांत सोलापूरमध्ये हजर झाल्याचा चमत्कार घडला. दरम्यान, हे प्रकरण ‘मॅट’कडे गेले आहे. 30 मिनिटांत सोलापुरात कसे पोहचलात? अशी विचारणा मॅटने राज्य सरकार आणि धोत्रे यांना केली आहे.

सोलापूर येथील अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या संकेतस्थळावर 14 ऑगस्ट रोजी दोन वाजून 57 मिनिटांनी बदली आदेश जारी करण्यात आला. यवतमाळ येथे कार्यरत संभाजी धोत्रे यांना अमरावती मुख्य अभियंता यांच्याकडून आदेश प्राप्त करून घेऊन कार्यभार सोडण्यास सांगितले होते. मात्र ते प्रत्यक्षात 14 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून 29 मिनिटांनी  सोलापूर अधीक्षक अभियंता कार्यालयात हजर झाले. विशेष म्हणजे धोत्रे हे 14 ऑगस्ट रोजी क्षेत्रीय स्तरावरील रस्त्यांच्या खड्डय़ांची पाहणी करण्यासाठी गेले होते, असे असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात यवतमाळचा कार्यभार न सोडता अवघ्या 30 मिनिटांमध्ये ते सोलापूरला कसे आले, हा प्रश्न निर्माण झाला आहे.