
मध्यपूर्वेतील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले असून इराणने इराकच्या ‘अल फाव’ बंदराजवळ दोन मोठ्या तेलवाहू जहाजांना थेट लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अमेरिकन मालकीच्या जहाजासह दोन टँकर्सना मोठी आग लागली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षात इराणने पहिल्यांदाच तेलवाहू जहाजांवर थेट हल्ला चढवला आहे. सोशल मीडियावर या हल्ल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओंमध्ये ‘झेफिरोस’ आणि ‘सेफसी विष्णू’ या दोन जहाजांवर मोठे स्फोट होऊन आगीचे लोळ उठताना दिसत आहेत. यापैकी ‘सेफसी विष्णू’ हे जहाज एका अमेरिकन कंपनीच्या मालकीचे आहे. या जहाजांमध्ये सुमारे 4 लाख बॅरल इराकी कच्चे तेल होते. या भीषण आगीमुळे समुद्रात तेल गळती झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
मध्यपूर्वेतील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले असून इराणने इराकच्या ‘अल फाव’ बंदराजवळ दोन मोठ्या तेलवाहू जहाजांना थेट लक्ष्य केले आहे. pic.twitter.com/w2GbEeDpJk
— Saamana Online (@SaamanaOnline) March 12, 2026
जर इराणवर हल्ले थांबले नाहीत, तर होरमुझच्या सामुध्रुनीतून एक थेंब तेल बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने यापूर्वीच दिला होता. जगातील 20 टक्के तेल पुरवठा याच मार्गाने होतो. या हल्ल्यानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 120 डॉलर्सच्या पार गेल्या आहेत. गेल्या चार वर्षांतील हा उच्चांकी दर आहे.
दरम्यान, गुजरातच्या कांडला बंदराकडे येणाऱ्या ‘मयुरी नारी’ या थायलंडच्या जहाजावरही इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला. हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून व्यापारी जहाजांवरील असे हल्ले चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.
Iran Israel USA War या ३ अटींवर इराण युद्ध थांबवण्यासाठी तयार; अमेरिकेला दिला निर्वाणीचा इशारा





























































