
विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओला, उबर, रॅपिडोच्या कॅब चालकांनी सुरू केलेला संप शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी सुरूच राहिला. कॅब चालकांनी आझाद मैदानात तीव्र निदर्शने केली आणि परिवहन विभाग व सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्या संपामुळे मुंबईतील प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. संपावर तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरले.
अॅप आधारित टॅक्सींसाठी अॅग्रीगेटर धोरणाची तातडीने अंमलबजावणी तसेच नियमित टॅक्सी चालकांप्रमाणे वेतन समानता आदी मागण्यांसाठी ओला, उबर, रॅपिडोच्या चालकांनी संप पुकारला आहे. इंधन, वाहतूक व इतर दैनंदिन खर्चात वाढ झाल्यामुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच सरकारने बाईक टॅक्सीची घोषणा केल्यामुळे त्यांची नाराजी वाढली आहे. संपामध्ये मुंबईतील शेकडो चालक सहभागी झाले आहेत. शुक्रवारी नागपूर, पुणे आदी शहरांतील चालकही संपावर गेल्याने प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे.