ऑलिम्पिकचा फिव्हर अंतराळ स्थानकात पोहोचला, अंतराळवीरांनी दाखवले आपले क्रीडाकौशल्य

पॅरिस ऑलिंपिकला सुरुवात झाली आहे आणि जगभरातले खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान नासाने स्पेस सेंटरमधील एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीरांनाही ऑलिम्पिकचा फिव्हर चढला असून अंतराळस्थानकात ते आपले क्रीडाकौशल्य दाखवताना दिसत आहेत. यात कोणी रेसिंग लावतोय तर कोणी गोळा फेक करतंय. एवढेच नाही तर खेळाआधी सर्व अंतराळवीर मशालही पास करताना दिसत आहेत. स्पेस स्टेशनमध्ये खेळ खेळणाऱ्या अंतराळवीरांमध्ये हिंदुस्थानची अंतराळवीर सुनीता विलियम्सही दिसत आहे. सध्या त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नासाने आपल्या एक्सच्या अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरमध्ये असलेले अंतराळवीर झिरो ग्रॅव्हीटीमध्ये मशाल घेऊन दिसत आहे. त्यानंतर हे अंतराळवीर वेट लिफ्टिंग, गोळा फेक आणि रनिंग आदी खेळ खेळताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओला प्रचंड पसंती दिली जात आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे आणि 50 हजारहून अधिक लोकांनी बघितला आहे.

या व्हिडीओ वर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहीले की, ही तर ऑलंपिंक वाईब्सची बेस्ट फिलिंग आहे, अन्य एका युजरने लिहीले की, ही तंत्रज्ञानाची दुनिया आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांनी या व्हिडीओचे प्रचंड कौतुक केले असून प्रतिक्रियांमध्ये अंतराळवीर हे खेळ प्रचंड व्हायरल होत आहे. स्पेसमध्ये शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये स्वतला स्थिर ठेवणे फार कठिण होते. अशा परिस्थितीत अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ज्या प्रकारे कामगिरी करत आहेत ते धक्कादायक आहे.