ओमराजेंवर हल्ला करणाऱ्याला पकडले, वाचा सविस्तर बातमी

1896

शिवसेनेनेचे धाराशिव इथले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर बुधवारी म्हणजेच दिनांक 16 ऑक्‍टोबर जीवघेणा हल्ला झाला होता. कळंब तालुक्यातील पाडोळी त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी रात्री पावणेबाराच्या सुमारास अटक केली आहे. या हल्ल्यामध्ये ओमराजे यांच्या हाताला दुखापत झाली होती. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना ओमराजे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने जबरदस्त खळबळ उडाली आहे.

ओमराजे यांच्यावर हल्ला करणाऱ्याचे नाव बुधवारीच कळाले होते. अजिंक्य टेकाळे असे त्याचे नाव असून त्याने नमस्कार करत ओमराजे यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. ओमराजे यांनी हात पुढे करताच टेकाळेने त्यांच्यावर चाकूने वार केला. वार अडवण्यासाठी ओमराजे यांनी दुसरा हात आडवा घातला ज्यामुळे चाकूचा वार त्यांच्या घड्याळावर बसला. या हल्ल्यात हातातील घड्याळ पडल्याने ओमराजे यांच्या हाताला जखम झाली होती. टेकाळे याला ओमराजे यांच्या पोटात चाकू खुपसायचा होता, मात्र ओमराजे यांच्या प्रसंगावधानामुळे त्याला ते शक्य झाले नाही.

हल्ला करणारा तरुण अजिंक्य गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला होता. अजिंक्यविरोधात ओमराजे यांनी शिराढोण पोलिस ठाण्यात नावानिशी फिर्याद दाखल केली होती. हल्लेखोराला पकडण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने चार पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी रात्री पोलिसांना अजिंक्य हा शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच सपोनि गिरमे यांचे पथक या शेतात पोहोचले आणि त्यांनी अजिंक्यला अलगद उचलला. हल्लेखोर हाती लागल्याने त्याने हा हल्ला का केला ? हल्ल्यामागे नेमकं कोण आहे याचा खुलासा लवकरच होऊ शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या