गणेशोत्सवाच्या तोंडावर कशेडी घाटातील जुना मार्ग बंदच; अकरा गावांतील ग्रामस्थांचे मेगा हाल

गणेशोत्सव तोंडावर आला असला तरी महामार्ग प्राधिकरणाने कशेडी घाटातील जुना मार्ग अद्याप सुरू केलेला नाही. त्यामुळे घाटाच्या परिसरात असलेल्या 11 गावांमधील ग्रामस्थांचे मेगा हाल सुरू आहेत. त्यांना प्रवास करण्यासाठी सुमारे दोन किलोमीटरचा वळसा घालून महामार्गावर यावे लागत आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या 15 दिवसांपासून बंद केलेला हा रस्ता सुरू न झाल्यामुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमध्येही संतापाची लाट उसळली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक कशेडी बोगदामार्गे सुरू करण्यात आली आहे. जुन्या मार्गावर सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कशेडी बंगला परिसरातील कशेडी गाव, कशेडी धारवाडी, कशेडी दरेकरवाडी, रावतळी, मानेधार यासह पळचील पंचक्रोशीतील गोलदरा, खडकावणे, दत्तवाडी, सावरीची वाडी, जलाची वाडी, गौळवाडी अशा अनेक गाववाड्यांना याचा फटका बसला आहे. या जुन्या मार्गावरील नागरिकांना प्रवासासाठी सुमारे दोन किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.

एसटी सेवा बंद झाली

या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने विभागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचे वाहन मिळत नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. या मार्गावर एसटी सेवा बंद असल्याने या विभागातील नागरिकांना सर्रास खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा मार्ग बंद असल्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

…. तर आंदोलन छेडणार

या मार्गावरील वाहतूक गौरी-गणपतीपूर्वी चालू न केल्यास सणानिमित्त या विभागात येणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांनाही याचा फटका बसणार आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता तातडीने सुरू करावा. जर गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता सुरू झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.