Jalna News : जालना जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच; दुहेरी अपघातात एक ठार, पाच जखमी

वारकऱ्यांच्या अपघाताच्या घटनेनंतर काही तासातच भोकरदन रोडवर पुन्हा दुहेरी अपघाताची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री उशिरा हे दोन्ही अपघात घडले. या अपघातांत एकाचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहेत. गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी अपघात पाहिले. त्यानंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

स्विफ्ट कार टँकरला धडकली

पहिली घटना गुरुवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास जालना ते भोकरदन रोडवरील डावरगाव शिवारात घडली. भोकरदनकडे जाणारी स्विफ्ट कार रोडलगत असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर आदळून समोरून येणाऱ्या खाद्यतेलाच्या टँकरला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा समोरच्या भागाचा चक्काचूर झाला. कारमधील एक जण जागीच ठार झाला. तर कारमधील अन्य दोघे जखमी झाले.

संदीप गुलाबराव साबळे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजू बाबुराव साबळे आणि दीपक प्रल्हाद लहुळकर अशी जखमींची नावे आहेत. गस्तीवर असलेले महामार्गचे पोलीस उपनिरीक्षक निकम आणि त्यांचे सहकारी अंमलदार कदम आणि दाभाडे यांनी तातडीने मृतदेह आणि जखमींना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात हलवले.

स्कॉर्पिओ ट्रकला धडकली

दुसरी घटना मध्यरात्री 12.15 वाजेच्या सुमारास याच जालना ते भोकरदन रोडवरील पिरपिंपळगाव पाटीजवळ घडली. भरधाव स्कॉर्पिओ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकली. या अपघातात स्कॉर्पिओतील तीन जण जखमी झाले आहेत. संदीप विष्णू वीर, ऋषीनाथ दंडगळ आणि अशोक कौतिकराव वीर अशी जखमींची नावे आहेत.

महामार्ग पोलिसांनी जखमींना तातडीने जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवले आहे. वारकऱ्यांच्या वाहनांसह झालेले हे तीनही अपघात चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.