बारामती लोकसभा मतदारसंघात दीड लाख मतं वाढली, सुप्रिया सुळे यांचा दावा

मतं चोरीवरून राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि पुरावे सादर केले होते. बारामती लोकसभा मतदारसंघातही दीड लाख मतं वाढली होती असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ही प्राथमिक माहिती आहे याचाही तपास व्हावा असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी माझ्याही मतदारसंघातला डेटा काढायला सुरुवात केली आहे. चौकशीची सुरुवात माझ्याच मतदारसंघातून करावी. प्राथमिक माहितीनुसार माझ्या लोकसभा मतदारसंघात लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या काळात एक लाख 60 हजार मतं वाढली. ही प्राथमिक माहिती असून उद्या किंवा परवा पूर्ण माहिती येईल. सगळीच माहिती बाहेर येऊदे, दूध का दूध पानी का पानी एकदाच होऊन जाऊदे. निवडणुकीत काही गडबड घोटाळा झाला असेल तर देशाला कळूदे. या देशात लोकशाही आहे. आम्ही पारदर्शक लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.