
मुंबईसह महाराष्ट्रात ढोलताशाच्या गजरात आणि डीजेच्या दणदणाटात शनिवारी दहीहंडी उत्सव अतिशय उत्साहात साजरा झाला. श्वास रोखून धरायला लावणारे तब्बल दहा थर रचून जागतिक विक्रम रचण्यात आला. या उत्सवात मुंबईत आणखी एका गोविंदाचा मृत्यू झाला असून एकूण तब्बल 318 गोविंदा जखमी झाल्याचे समोर आले आहे. 294 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून 24 गोविंदांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथे दहीहंडी बांधताना 32 वर्षीय जगमोहन शिवकिरण चौधरी या गोविंदाचा तोल जाऊन अपघात घडला. गंभीर जखमी झालेल्या जगमोहनला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. महाराष्ट्र नगर येथील आपल्याच घराच्या खिडकीत जगमोहन दहीहंडीचा रोप बांधत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. तर पवईतील गावदेवी गोविंदा पथकाच्या रोहन मोहन माळवी या गोविंदाला अंधेरी येथील आदर्श नगर परिसरात टेम्पो आला असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला घाटकोपर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू काविळीमुळे झाल्याचे समोर येत आहे.
कावीळ असतानाही दहीहंडीसाठी फिरला
कावीळ झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु अशा परिस्थितीतही तो दहीहंडी उत्सवात सहभागी झाला होता. दिवसभर फिरल्यानंतर सायंकाळी त्याची प्रकृती बिघडली. असल्फा परिसरातील दहीहंडी उत्सवात त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला तत्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नियमाचे उल्लंघन करणाऱ्या गोविंदांवर कारवाई
वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या गोविंदांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलिसांनी दहा हजारांपेक्षा अधिक गोविंदांवर कारवाई केली. एक कोटीपेक्षा अधिक रकमेचा दंड ठोठावला आहे.
शनिवारी मुंबईत दहीहंडी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आला. गल्लीबोळापासून मोठय़ा सोसायटीमध्ये दहीहंडीचे आयोजन केले होते. शहरातील अनेक गोविंदा मंडळ ही सकाळीच दहीहंडी पह्डण्यासाठी बाहेर पडली. मोटरसायकलवर ट्रिपल सीट, सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, वाहनाच्या टपावर बसून प्रवास करणे, अति वेगात वाहन चालवणे, विना हेल्मेट वाहन चालवण्याचे प्रकार सुरू होते. त्याची दखल वाहतूक पोलिसांनी घेतली. पोलिसांनी 10051 जणांवर ई-चलानद्वारे कारवाई केली. आणखी काही सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. त्यानंतर आणखी काहींना ई चलान जारी करण्यात येणार असल्याचे समजते, तर वाळकेश्वर येथे दहीहंडीची तयारीदरम्यान ड्रोन उडवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद करून एका तरुणाला ताब्यात घेतले.
जखमी गोविंदांच्या पाठीवर मायेचा हात
शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच डॉक्टरांकडून गोविंदांवरील उपचाराची माहिती घेतली. यावेळी उपविभागप्रमुख पराग चव्हाण, शाखाप्रमुख मिनार नाटाळकर, महिला शाखा संघटक भारती पेडणेकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे विधानसभा संघटक प्रथमेश जगताप, राजू बाईंग, सुरेश चाचे, प्रदीप वाटाणे, देवेंद्र सावंत आणि शिवसैनिक उपस्थित होते. रुग्णालयात स्वप्नील पवार, श्रावण उतेकर, रोहन डिके, ज्ञानेश्वर गायधनकर, अक्षय गुरव, तनिष्का जाधव आणि आकाळ मिसाळ यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शिव आरोग्य सेनेचाही आधार
शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार आणि राज्य सरचिटणीस जितेंद्र दगडू सपकाळ यांच्या उपस्थितीत केईएम रुग्णालयात जाऊन जखमी गोविंदांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर यांच्याकडून उपचाराची माहिती घेतली. यावेळी शिव आरोग्य सेनेच्या मुंबई जिल्हा सचिव ज्योती भोसले, आरोग्य सेनेचे मुंबई सह समन्वय प्रकाश वाणी, उर्मिला पांचाळ, अमोल बोरकर, अनंत कोटकर, नंदकुमार बागवे, राजाराम झगडे, अक्षया चव्हाण, संदेश कोटेकर, गुलाब ठाकूर आदि उपस्थित होते.
कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी दहीकाला
शिवसेना विभाग क्रमांक 10 च्या वतीने आणि माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले तसेच भीमराव धुळप यांच्या पुढाकारातून दादरमध्ये दहीकाला उत्सव उत्साहात पार पडला. हा उत्सव कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आला. पाच थरांसाठी 501, सहा थरांसाठी 1111 रुपये आणि सन्मानचिन्ह तसेच पेंब्रिज शर्ट देण्यात आला. अमर सुभाष गोविंदा पथकाने आठ थर लावून मानाची दहीहंडी पह्डली. यावेळी सहयोग मित्र मंडळ, पुंभारवाडा-दादर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला युवा सेनेचे सचिव साईनाथ दुर्गे, उपविभाग प्रमुख सिद्धार्थ चव्हाण, पैलास पाटील, अभिजित कदम, विवेक पाठकर, केतन खेडेकर उपस्थित होते.
अंधेरीत उत्साह
अंधेरीच्या शाखा क्रमांक 66 च्या महिला शाखा संघटक मिनाली पाटील आणि प्रथमेश पाटील यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. रोख रुपये 4,44,444 रुपयांचे रोख पारितोषिक ठेवण्यात आले होते. गावदेवी मित्र मंडळ दहीकाला पथकाने या बक्षिसाचा मान मिळवला. यावेळी प्रियान जैन, विधानसभा संघटक संजय कदम, महिला विभाग संघटक अनिता बागवे, उपविभागप्रमुख प्रसाद आयरे, संजीवनी घोसाळकर, शाखाप्रमुख उदय महाले, दयानंद कड्डी, रेवती सुर्वे, ग्राहक संरक्षण कक्ष संघटक रमेश मालवणकर, राजेश खाडे आदी उपस्थित होते.
ठाण्यात 22 गोविंदा जखमी
ठाण्यात दहीहंडी उत्सवात एकूण 22 गोविंदा जखमी झाले, त्यापैकी 17 जणांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला, खांद्याला, मनगट आणि छातीला मार लागल्याने हे गोविंदा जखमी झाले. 18 वर्षीय गोविंदाच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच गोविंदांना ठाण्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.






























































