
मुंबईत गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. अंधेरीत साकीनाका येथील खैरानी रोडवरील एस. जे. स्टुडिओजवळ विसर्जन मिरवणुकीत टाटा पॉवरच्या हाय-टेंशन वीजतारांचा स्पर्श झाल्याने सहा जणांना शॉक लागला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून उर्वरित पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, विसर्जनासाठी जेव्हा गणपती मिरवणूक सुरू होती तेव्हा विजेच्या तारांना त्याचा स्पर्श झाला. त्यामुळे सहा जणांना विजेचा जबर धक्का बसला. अपघातानंतर लगेच सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी पाच जणांना साकीनाका येथील पॅरामाउंट रुग्णालयात आणि एकाला सेवन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत विनू शिवकुमार नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तर उर्वरित पाच जखमींमध्ये चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पॅरामाउंट रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये तुषार गुप्ता (18), धर्मराज गुप्ता (44), आरुष गुप्ता (12), शंभू कामी (20) यांचा समावेश आहे.