अकरावी ऑनलाइन प्रवेश – कोटय़ामुळे जास्त टक्केवारीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेतील विविध आरक्षणामुळे गुणवत्ताधारक, जास्त टक्केवारीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप सिस्कॉम या संघटनेने केला आहे. सध्या अल्पसंख्याक, इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा एकूण 75 टक्के आहे. कोटय़ातील आरक्षणाचे हे प्रमाण कमी करून 50 टक्के करावे, अशी मागणी सिस्कॉमने शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.

यंदा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील आरक्षण (एसईबीसी) 16 वरून 12 टक्के केले आहे. मात्र प्रचलित अल्पसंख्याक, इनहाऊस, मॅनेजमेंट कोटय़ातील आरक्षण ‘जैसे थे’च आहे. हे आरक्षणही कमी करायला हवे. सध्या इनहाऊस 25 टक्के, अल्पसंख्याक 50 टक्के, मॅनेजमेंट 5 टक्के असे एकूण 75 टक्के आरक्षण आहे. हे सर्व आरक्षण मिळून 50 टक्के करण्याची मागणी सिस्कॉमने केली आहे.

विशेष फेऱ्यांमुळे प्रवेशप्रक्रिया लवकर संपेल?

कोरोनाच्या पाश्वभूमीवर शिक्षण विभागाने मंगळवारी अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेविषयीचा अध्यादेश जारी केला. या अध्यादेशात यंदा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी रद्द केल्याचे म्हटले आहे. या निर्णयाचे सिस्कॉमने स्वागत केले आहे. मात्र ऑनलाईन प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यानंतर राबविण्यात येणाऱ्या विशेष फेऱ्यांमुळे प्रवेशप्रक्रिया जलदगतीने पार पडेल का असा सवाल सिस्कॉमच्या अध्यक्षा वैशाली बाफना यांनी केला आहे.