
म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील संक्रमण शिबिरात राहणाऱ्या मूळ भाडेकरू, रहिवासी आणि वारसदार यांच्याकडून 20 मे रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मास्टर लिस्टवरून पात्रता निश्चित करून गाळे वितरणासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदाराची नोंदणी व ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता masterlist.mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरू, रहिवाशी यांना निष्कासन सूचना देऊन इमारत खाली केली आहे व विविध कारणांमुळे पुनर्विकास शक्य नाही. तसेच उपकरप्राप्त इमारती पुनर्रचित झालेल्या आहेत, परंतु कमी घरे बांधली गेली आहेत अशा रहिवाशांना यापूर्वी मंडळाद्वारे पुनर्रचित किंवा पुनर्विकसित इमारतीत कायमस्वरूपी घर देण्यात आलेले नाही अशा मास्टर लिस्टवरील मूळ भाडेकरू, रहिवासी अथवा त्यांच्या वारसदारांसाठी सदर ऑनलाइन अर्ज प्रकिया राबविण्यात येत आहे.
समितीने यापूर्वी पात्र केलेल्या अर्जदारांनी नव्याने अर्ज दाखल करू नये. तसेच ज्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केला आहे, अशांनी पुन्हा नव्याने अर्ज दाखल करू नयेत. ज्यांनी यापूर्वी ऑफलाइन अर्ज केलेला आहे, परंतु त्यांचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे अशांनी नव्याने ऑनलाइन अर्ज दाखल करावा.
अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जदाराने स्वतः प्रमाणित केलेले, अर्जासोबत ऑनलाइन सादर केलेले कागदपत्र 30 दिवसांच्या आत म्हाडा मुख्यालयातील कक्ष क्र. 372 येथे सादर करावेत. सुनावणीवेळी अर्जदाराने सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत आणाव्यात. त्यानंतर अर्जदाराची पात्रता व गाळ्याचे वितरण याबाबत निर्णय घेण्यात येईल.