विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने झारखंडमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. झारखंडमधील सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चामध्ये फूट पाडण्यासाठी ‘ऑपरेशन लोटस’ राबवले जात आहे. माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह आणखी काही आमदारांना गळाला लावण्यासाठी भाजपने फासे टाकले आहेत. त्यामुळे आगामी काळात झारखंडमध्येही महाराष्ट्र पॅटर्न पहायला मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे या चर्चा सुरू असतानाच चंपाई सोरेन यांच्यासह झारखंड मुक्ती मोर्चाचे 6 आमदार दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त आहे.
चंपाई सोरेन हे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या संपर्कात असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांना घेऊन ते दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबतच्या आमदारांसोबत पक्षनेतृत्वाचा संपर्क होत नसून सोरेन यांच्यासह ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. यात दशरथ गगराई, रामदास सोरेन, चमरा लिंडा, लोबिन हेमब्रोम, समीर मोहंती अशी या आमदारांची नावे आहेत.
चंपाई सोरेन हे शनिवारी रात्री कोलकातातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांची भेटही घेतली. त्यानंतर रविवारी सकाळी ते विमानाने दिल्लीला रवाना झाले. दिल्ली दौऱ्यादरम्यान ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, ते आसामच्या दिशेनेही रवाना होण्याची शक्यता आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे झारखंड भाजपचे प्रभारी आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेऊन सोरेन पुढील राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी चंपाई सोरेन यांना भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हसून हा प्रश्न टाळला आणि तुम्ही असा प्रश्न विचारत आहात. त्यावर मी काय बोलू. सर्व तुमच्यासमोर आहे, असे उत्तर दिले होते. त्यानंतर ते गाडीत बसून निघून गेले.
हेमंत सोरेन हे तुरुंगामध्ये असताना चंपाई सोरेन यांची राज्याची सूत्रं हातात घेतली होती. 2 फेब्रुवारी 2024 ते 3 जुलै 2024 या काळात राज्याचे सातवे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिले. मात्र सोरेन तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
कोण आहेत चंपाई सोरेन?
शिबू सोरेन यांच्यासोबत चंपाई सोरेन यांनी झारखंड राज्याची मागणी रेटून धरली. झारखंड मुक्ती मोर्चाच्या फुटीनंतरही ते शिबू सोरेन यांच्यासोबत राहिले. 1991 ला ते पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले आणि त्यानंतर त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चात प्रवेश केला. 2000मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकार करावा लागला. मात्र 2005 पासून ते सातत्याने विजयी होत आहेत. राज्यात पहिल्यांदा भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार बनले तेव्हाही ते मंत्री होते. पुढे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारमध्ये चंपाई सोरेन यांना अन्न, नागरी पुरवठा आणि वाहतूक मंत्री करण्यात आले. हेमंत सोरेन 2019 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर चंपाई यांना परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री करण्यात आले आहे. चंपाई झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्षही आहेत. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपाई यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती.