ऑपरेशन टायगर चालवणाऱ्यांनी लक्षात ठेवावं की त्यांच्याच गटाचं ऑपरेशन होत आहे, संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जे दिल्लीत ऑपरेशन टायगर चालवत आहे त्यांनी लक्षात ठेवावं की त्यांच्याच गटाचं ऑपरेशन होत आहे असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत यांनी केला. तसेच कोकणात एक म्हण आहे केले तुका झाले माका, त्यांच्याच पक्षात खदखद आहे, त्याचाही स्फोट होऊ शकतो असे सूचक विधानही संजय राऊत यांनी केले.

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, “दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे असतील किवा अजित पवार गटाचे नेते ते नेहमीच येत असतात. उपमुख्यमंत्री शिंदे किंवा अजित पवार गट हे पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अंगवस्त्र आहेत. हे पक्ष अमित शहांनी स्थापन केलेले पक्ष आहे. नरेंद्र मोदी हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. आमचे मार्गदर्शक हे बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, उद्धव ठाकरे हे आमचे. त्यांचे अमित शहा, नरेंद्र मोदी, निशिकांत दुबे वगैरे हे त्यांचे मार्गदर्शक आहेत सगळे. त्यामुळे त्यांना दिल्लीमध्ये यावं लागतं.

मुळात शहा आणि मोदींनी या सगळ्या लोकांची मांजरं केलेली आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये, सत्ता आणि पैसे आहेत. तपास यंत्रणा आहेत, निवडणूक यंत्रणा हाताशी आहे. त्याचा गैरवापर करून हे अमिषं दाखवतात, धमक्या देतात. हे फार काळ चालणार नाही.

कथित ऑपरेशन टायगरबाबात संजय राऊत म्हणाले की, इथे जर कोणी ऑपरेशन करणार असेल तर त्यांनी दिल्लीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. या दिल्लीला पानिपतापासून आणि मोगल काळापासून फार मोठा इतिहास आहे. इथे जे जे लोक अशा प्रकारचं ऑपरेशन करायला आले ते निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात गेले. त्यांना परागंदा व्हावं लागलं. या दिल्लीतून कधी ना कधी प्रत्येकाला जावंच लागतं, ही दिल्ली कोणाची नाही.

ऑपरेशन वगैरे करायला येणारे लोक आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे. मुळात त्यांच्या गटामध्ये ऑपरेशन होतंय. मी वारंवार सांगतो त्यांच्या गटामध्ये ऑपरेशनच काम सुरू आहे. एका वेगळ्या गटाकडून आणि ते त्याही ऑपरेशनची सूत्र दिल्लीतून हलतायत. मी यावर फार मत व्यक्त करणे योग्य नाही. जशी तुमच्याकडे माहिती असते तशी माझ्यासारख्या माणसाकडे ही माहिती असते आणि ती असायला पाहिजे. दिल्लीमध्ये बसल्यावरती अशा अनेक माहिती येत असतात. त्या माहितींचे संकलन होत असतं. मी कोणाच नाव घेणार नाही. कोणाचही नाव घेण्याचा मला अधिकार नाही. कोणावरती चिखलफेक करणं, अशा प्रकारे राजकीय दृष्ट्या आरोप करणं हे योग्य नाही . पण काहीतरी घडतंय, खदखद आहे आणि त्याचा स्फोट होऊ शकतो. ‘केले तुका आणि झाले माका’ अशी आमच्या कोकणामध्ये म्हण आहे. ते काहीतरी करायला जातात ते त्यांच्यावरती उलटू शकतं.

आमचे नऊ खासदार चार दिवसांपूर्वी इथेच बैठकीला आले होते. प्रत्येकाच्या मतदारसंघातल्या अडचणी आहेत. कोणत्याही प्रकारचा निधी विरोधी पक्षाच्या आमदारांना, खासदारांना दिला जात नाही. त्यांची कोंडी केली जाते. केंद्राच्या आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहे की विरोधी पक्षाच्या आमदारांच्या आणि खासदारांच्या कामांची दखल घ्यायची नाही.
यांच्या बापाचा पैसा आहे? धुनी भांडे करून यांच्या बापजाद्यांनी पैसा गोळा केलाय तिजोरीमध्ये? हा जनतेचा पैसा आहे. महाराष्ट्राच्या आणि विरोधी पक्षाचे आमदार जिथून निवडून आले आहेत, खासदार निवडून आलेत त्या भागाचा सुद्धा विकास होणं गरजेचं आहे. हे त्यांना कळत नाही. पण त्यांच्या स्पष्ट सूचना राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या, देवेंद्र फडणवीसांच्या, इतर दोन उपमुख्यमंत्र्यांच्या आणि केंद्राच्या की विरोधी पक्षांच्या आमदार खासदारांची कोणतीही काम करायचे नाही. त्यांना एक रुपयाही निधी द्यायचा नाही. अशा प्रकारे राज्य आणि देश चाललेलं आहे. देशभरातल्या विरोधी पक्षाच्या खासदारांची अशा प्रकारे कोंडी केली जाते.

ओरिसामध्ये राज्यसभेसाठी निवडणूक झाली. भाजपने कोणाला निवडून आणलं? दिलीप रे. कोण आहेत? ज्यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली, कोल स्कॅममध्ये आरोप झाले, एफआयआर झाला, कोर्टाने शिक्षा ठोठावली, तुरुंगवास भोगला. अशा लोकांना तुम्ही निवडून आणताय, पण ज्यांना लोकांनी प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं आहे त्यांची तुम्ही कोंडी करताय.

महाराष्ट्रात काँग्रेसच्या आमदारांना विचारा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विचारा, जे काही लहान पक्ष आहेत समाजवादी पार्टी असेल त्यांना विचारा. तुम्ही विरोधी पक्षाच्या आमदारांना, नगरसेवकांना विकासाचा निधी देत नाही आणि हा पैशाची उधळपट्टी तुम्ही तुमच्यातच सुरू आहे. ही कोणती लोकशाही आहे? हे कोणत्या प्रकारचं राज्य चाललेलं आहे?

भाजपच्या गळ्याला फक्त दिलीप रे सारखेच खासदार लागू शकतात, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत, ज्यांच्यावर खून, दरोडे, बलात्काराचे आरोप आहेत. अशा लोकांनाच भारतीय जनता पक्ष आपल्या गळाला लावू शकते.

राज्यसभा क्रॉस व्होटिंग भारतीय जनता पक्षाने पैसा आणि सत्तेच्या जोरावर करवून घेतली आहे. हरियाणा असो, बिहार असो किंवा ओरिसा असो. ओरिसामध्ये क्रॉस व्होटिंग कोणासाठी करवली? एका अशा व्यक्तीसाठी ज्यांच्यावर कोल स्कॅममध्ये आरोप झाले, एफआयआर झाला आणि कोर्टाने शिक्षा दिली, तीन वर्षांची शिक्षा सुनावली. अशा व्यक्तीसाठी भारतीय जनता पक्षाने ओरिसामध्ये क्रॉस व्होटिंग करवली. ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली, बीजेडी असो किंवा काँग्रेस असो, त्यांना 50 कोटींपेक्षा जास्त पैसे देण्यात आले. काही पैसा मुंबईतून गेला, अशी माझी माहिती आहे. भाजप नेत्यांचा खरेदी-विक्रीत त्यांचा वेळ जातो. अशा व्यक्तीला निवडून आणताना भारतीय जनता पक्षाला लाज वाटत नाही, आणि तुम्ही स्वतःला नीतिमान, संस्कारी पार्टी म्हणवता? असेही संजय राऊत म्हणाले.