FCRA सुधारणा विधेयकाविरोधात संसद परिसरात विरोधी पक्षांच्या खासदारांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनी बुधवारी संसद परिसरात ‘परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक, 2026′ (FCRA Bill, 2026) विरोधात आंदोलन केले आणि हे प्रस्तावित विधेयक मागे घेण्याची मागणी केली. स्वयंसेवी संस्था स्वायत्त संस्थांना लक्ष्य करणे थांबवा’ असा मजकूर लिहिलेला एक मोठा फलक झळकावत, खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि विधेयक मागे घेण्याची मागणी लावून धरली.

या आंदोलनात काँग्रेसचे अनेक खासदार, समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव आणि राम गोपाल यादव, IUML चे ई.टी. मोहम्मद बशीर, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि एन.के. प्रेमचंद्रन यांच्यासह इतर अनेक खासदारांनी सहभाग घेतला. भाजप संसदेत FCRA सुधारणा विधेयक बळाचा वापर करून मंजूर करून घेण्याच्या तयारीत आहे, असा दावा काँग्रेसने मंगळवारी केला होता. तसेच, हे उघडपणे असंविधानिक आणि अत्याचारी विधेयक मंजूर होऊ देणार नाही, असेही काँग्रेसने स्पष्ट केले होते.

काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी पक्षाच्या खासदारांना तातडीने दिल्लीत पोहोचून बुधवारी संसदेच्या कामकाजात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले होते. ‘परकीय योगदान (नियमन) कायदा’ (FCRA) मध्ये सुधारणा करणारे हे विधेयक 25 मार्च रोजी लोकसभेत सादर करण्यात आले होते. परकीय निधीचा वापर करून सक्तीचे धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तींना कदापि सोडले जाणार नाही, असे सरकारने यावेळी स्पष्ट केले होते.