महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे अधिवेशन, विरोधी पक्षाचा महायुती सरकारवर जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे, महायुती सरकारचा नाकर्तेपणा दाखवणारे आणि केवळ इतिहासात रमणारे अधिवेशन होते, असा जोरदार हल्ला विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने आज केला.

विधिमंडळ अधिवेशनाचे आज सूप वाजले. त्यानंतर विधान भवनात विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते आमदार ऍड. अनिल परब, विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सरकारचे वाभाडे काढले.

विरोधकांना बोलू द्यायचे नाही असा सरकारचा कट – जयंत पाटील

एकाच वेळी चार चार प्रस्तावांवर उत्तर देण्याची अनिष्ट प्रथा अधिवेशनात आल्याचा आरोप यावेळी जयंत पाटील यांनी केला. सभागृह चालवण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात;पण एकच मंत्री तीन-तीन प्रस्तावांवर भाषण करतो. त्यामुळे तो नेमका कोणत्या प्रस्तावावर बोलतो हेच कळत नाही, असे पाटील म्हणाले. विरोधकांना बोलू द्यायचे नाही हा सरकारचा कट आहे, असा आरोप त्यांनी केला.

विरोधकांना कमकुवत म्हणणारे सरकार नाकर्ते ठरले अनिल परब

विरोधी पक्ष कमकुवत झालाय असा आरोप करणाऱया सरकारने आज अधिवेशनाच्या शेवटच्या क्षणी घिसाडघाईने विधेयके आणली. आणायची होती तर इतक्या दिवसांत का आणली नाहीत, असा सवाल अनिल परब यांनी केला. सत्तेच्या बहुमताचा माज काय असतो हे आपण अधिवेशनात पाहिले. सरकारकडे राक्षसी संख्याबळ आहे. त्यामुळे विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरच द्यायचे नाही असा माज पाहायला मिळाला. गेल्या पाच अधिवेशनात किती एसआयटी बनवल्या आणि त्यांचे काय अहवाल आले हेसुद्धा सरकार सांगू शकले नाही, असे अनिल परब म्हणाले.

धाकदपटशा दाखवून विधेयके मंजूर करणे निषेधार्ह – सुनील प्रभू

सरकारने या अधिवेशनात धाकदपटशा दाखवून विधेयके मंजूर करून घेतली, हे निषेधार्ह आहे, असे सुनील प्रभू म्हणाले. महापालिकेवर विधेयक आणले गेले. ते मंजूर करताना त्याचा उद्देश सांगणे आवश्यक होते. कारण महापालिका आयुक्तांना विशेष अधिकार देण्याचे ते विधेयक होते. ते मंजूर करण्यापूर्वी सॉलिसिटर जनरलचे मत तुम्ही घेतलेय का, असे आम्हाला विचारायचे होते. पण सरकारने जबरदस्तीने ते विधेयक मंजूर केले.