
हिंदुस्थानातील आयटी क्षेत्रात अग्रणी मानल्या जाणाऱ्या ओरॅकलने, केलेली कर्मचारी कपात ही आता चर्चेचा विषय झालेली आहे. ओरॅकलकडून हिंदुस्थानातून १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या कर्मचारी कपातीमागे एआय हे कारण दिले जात आहे. दरम्यान, परप्लेक्सिटीचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांचे एक विधान चर्चेत आलेले आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘ऑल इन’ पॉडकास्टमध्ये अरविंद श्रीनिवास यांनी सांगितले की, एआयमुळे ज्यांची नोकरी जाईल, त्यांनी याकडे एक संधी म्हणून पाहावे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. पॉडकास्ट दरम्यान, त्यांनी सांगितले की, नोकरी जाणे तात्पुरते असले तरी, एआय साधने लोकांना छोटे व्यवसाय सुरू करण्याची आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याची संधी देतात.
अरविंद श्रीनिवास यांनी सविस्तरपणे स्पष्ट केले की, सत्य हे आहे की अनेक लोक त्यांच्या नोकरीमुळे नाखुश आहेत. आता, ही साधने शिकून स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याची एक नवीन शक्यता आणि संधी निर्माण झाली आहे. सीईओच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर बरीच टीका झाली आहे. अनेकांनी म्हटले आहे की स्वतःचा व्यवसाय सुरू करणे सोपे नाही. तथापि, काही लोकांनी या मताचे समर्थनही केले आहे.
अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की, पुढील पाच वर्षांत केवळ अमेरिकेत एआयमुळे अंदाजे ९० लाख नोकऱ्यांवर परिणाम होईल. याचा परिणाम प्रोग्रामिंग, वेब डिझाइन आणि डेटा सायन्ससारख्या नोकऱ्यांवर होईल. उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी असा इशाराही दिला आहे की बेरोजगारी ३०% पेक्षा जास्त होऊ शकते. ओरॅकलने सध्या अंदाजे १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही कंपनीव्यापी मोठ्या कर्मचारी कपातीचा एक भाग आहे, ज्यामध्ये कंपनी जागतिक स्तरावर ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे.


























































