भीमा पाटस साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे दौंडमधील आमदार राहुल पुल अध्यक्ष असलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी जारी केले आहेत. माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह काही शेतकऱयांच्या तक्रारीवरून सहकारी संस्था कायदा कलम 83 (1) अन्वये ही चौकशी लावण्यात आली आहे.

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यासंदर्भात सहकार मंत्र्यांकडे दाखल प्रकरणात कायद्यातील कलम 83(1)मधील तरतुदींच्या पूर्ततेसंबंधीची पडताळणी करण्याकरिता हे प्रकरण फेरनिर्णयार्थ साखर सहसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. त्यांनी घेतलेल्या उभयपक्षी संयुक्त सुनावण्यानंतर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. भाजपच्या आमदाराच्या कारखान्याची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी आमदाराच्या तक्रारीवर अशा प्रकारची चौकशी लागल्याने जिह्यातील सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सहकार खाते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे जिह्यातील भाजपच्या एकमेव आमदाराला शह देण्याचा प्रयत्न यातून दिसून येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम सहकार कायद्यातील कलम 83अन्वये साखर सहसंचालकांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. कारखान्याच्या कारभाराच्या विविध 13 मुद्दय़ांवर ही चौकशी होणार असून त्यासाठी सहकारी संस्थांचे विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 (साखर) द्वारकानाथ पवार यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

  • साखर कारखान्याच्या कारभारामध्ये नक्की किती घोटाळा झाला, किती किमतीचे आर्थिक नुकसान झाले. तसे झाले असल्यास या आर्थिक नुकसानीच्या रकमेबाबत मुद्देनिहाय स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा. चौकशी अधिकारी यांनी चौकशी आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत चौकशी पूर्ण करावी, असेही गायकवाड यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.