
एचआयव्ही आणि एड्सबाबतची जनजागृती करण्यासाठी पालिका संचालित मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी ‘रन टू इन्ड एड्स’ या संकल्पनेअंतर्गत एचआयव्ही एड्स विषयाची महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही मॅरेथॉन पार पडली. तरुणाईनेही मोठय़ा प्रमाणात सहभाग नोंदवतानाच या स्पर्धेसाठी चांगल्या संख्येने हजेरी लावली. रविवारी पार पडलेल्या मॅरेथॉनमध्ये मुलांमध्ये टोपीवाला महाविद्यालयाच्या विशाल पावरा आणि विजय ओकसा यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवले तर मुलींमध्ये रूबी धोडी (शासकीय दंत महाविद्यालय) आणि स्विटी म्हात्रे (विल्सन महाविद्यालय) यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान पटकावले तर तृतीयपंथी समाजातून सहभागी झालेल्या गणेश चिखलकर (गव्हर्नमेंट लॉ कॉलेज) आणि सागर शहा (डी. वाय. पाटील) या विद्यार्थ्यांनी पहिले व दुसरे स्थान मिळवले.