मुंबईकरांना संगीत नाटकांची पर्वणी!

मुंबईचे नेहरू सेंटर हे सातत्याने अनेकविध उपक्रमांचे आयोजन करून आपली कला, संस्कृती जतन आणि विज्ञानाचे प्रचार, प्रसार करण्याचे कार्य करते. केंद्राच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित 32 वा मराठी संगीत नाटक महोत्सव यंदा 20 ते 23 ऑगस्ट या दरम्यान वरळीच्या नेहरू सेंटर सभागृहात रोज सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.

महोत्सवाअंतर्गत 20 ऑगस्ट रोजी पुण्याच्या भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेचे ‘लावणी भुलली अभंगाला’ हे संगीत नाटक तर 21 ऑगस्टला स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान, पुणे या संस्थेचे ‘संगीत सौभद्र’ हे नाटक सादर होणार आहे. 22 ऑगस्टला गुहागर येथील परस्पर सहाय्यक मंडळाचे ‘जय जय गौरी शंकर’ हे संगीत नाटक तर 23 ऑगस्टला संगीतभूषण पंडित राम मराठे फाउंडेशनच्या वतीने ‘मंदारमाला’ हे संगीत नाटक सादर केले जाणार आहे.

मुंबईकरांना विनामूल्य या नाटकाचा आनंद घेता येईल. प्रवेशिका 16 ऑगस्टला सकाळी 10.30 वाजल्यापासून नेहरू सेंटर सभागृह येथे उपलब्ध आहेत. हा महोत्सव संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी स्मृतीस अर्पण करण्यात येणार आहे.