
मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील वाढत्या लष्करी संघर्षामुळे सध्या संपूर्ण जग चिंतेत असतानाच, या युद्धाचे सावट आता जगातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या 98व्या ऑस्कर पुरस्कारावर पसरले आहे. इराण आणि इस्रायलमधील प्रत्येकी दोन चित्रपट या मानाच्या पुरस्कारांसाठी पात्र ठरले असून, एका बाजूला स्फोटांचा थरार सुरू असताना दुसरीकडे कलाकृतींच्या माध्यमातून हा संघर्ष जगासमोर येणार आहे. विशेष म्हणजे, दोन्ही देशांचे चित्रपट वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन मिळवून असल्याने ते एकमेकांसमोर थेट उभे नसले, तरी जागतिक व्यासपीठावरून शांतता आणि विद्रोहाचा संदेश देण्याची ही मोठी संधी मानली जात आहे.
इराणचे प्रसिद्ध दिग्दर्शक जाफर पनाही यांचा ‘इट वॉज जस्ट एन ॲक्सिडेंट’ हा चित्रपट यंदा आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. इराणमध्ये सरकारविरोधी कारवायांच्या आरोपाखाली वारंवार तुरुंगवास सोसलेल्या पनाही यांनी हा चित्रपट अत्यंत गुप्तपणे चित्रीत केला होता. विशेष म्हणजे, ज्या वेळी हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत दाखल झाला, त्याच वेळी पनाही यांना इराणमध्ये अनुपस्थितीत एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा चित्रपट ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ आणि ‘सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा’ या दोन श्रेणींमध्ये नामांकित आहे. जर या चित्रपटाला ऑस्कर मिळाला, तर इराणचा हा या श्रेणीतील तिसरा पुरस्कार ठरेल. यासोबतच मोहम्मदरेझा आयनी आणि सारा खाकी दिग्दर्शित ‘कटिंग थ्रू रॉक्स’ हा चित्रपट ‘सर्वोत्कृष्ट माहितीपट’ श्रेणीत नामांकन मिळवणारा पहिला इराणी माहितीपट ठरला आहे. एका दुर्गम गावातील महिला कौन्सिलरच्या संघर्षाची ही कथा बदलत्या इराणचे दर्शन घडवते.
दुसरीकडे, इस्रायलनेही माहितीपट आणि लघुपटांच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे. हिला मेडालिया दिग्दर्शित “चिल्ड्रन नो मोअर: वेअर अँड आर गॉन” हा माहितीपट ‘सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट’ श्रेणीत नामांकित आहे. हा चित्रपट गाझा युद्धातील निष्पाप मुलांच्या मृत्यूवर भाष्य करणारा असून मानवी करुणा जागृत करण्याचा प्रयत्न करतो. तसेच मेयर लेव्हिन्सन-ब्लाउंट यांचा ‘बुचर स्टेन’ हा चित्रपट ‘सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन लघुपट’ श्रेणीत आपले नशीब आजमावत आहे. एका सुपरमार्केटमध्ये काम करणाऱ्या पॅलेस्टिनी कसाईची ही कथा युद्धकाळातील संशय आणि अस्तित्वाच्या लढाईवर प्रकाश टाकते.
आखाती युद्धाच्या 16 व्या दिवशी आयोजित होत असलेल्या या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अनेक कलाकार नवव्या शतकातील पोशाखात उपस्थित राहून युद्धाचा निषेध नोंदवण्याची शक्यता आहे. इराणमधील सर्वोच्च नेत्यांचा मृत्यू आणि हजारो नागरिकांचा बळी घेणाऱ्या या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, सिनेविश्वातील हे कलाकार व्यासपीठावरून कोणता संदेश देतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.



























































