महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जेवढ्या जागा मिळाल्या आहेत, त्यातल्या जवळपास सर्व जागांवर 80 टक्के मताधिक्य मिळाले आहेत. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील प्रयोग यशस्वी झाला आहे. लोकसभेत भाजपक्षाला 240 जागांच्या रोखण्यात आम्हाला यश आले आहे, यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी नगर येथे केले. नगरमध्ये पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचा राज्यामध्ये प्रयोग यशस्वी झाला आहे. जनतेने आम्हाला भरभरून साथ दिली आहे. देशातील महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांना जनतेने महत्त्व दिले. निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम दिसून आला, त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत, असेही जयंत पाटील म्हणाले. भाजपला 240 जागांवर रोखण्यात आम्हांला यश आले आहे. त्यात महाविकास आघाडीचा वाटा मोठा आहे, असेही ते म्हणाले.
आमदार मिटकरी यांनी जयंत पाटील लवकर भाजपमध्ये जातील असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी त्याच्या माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्यांच्या अपप्रचाराला यश आले नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. महाराष्ट्रातील जनता आणि कार्यकर्ते कोणासोबत आहेत हे आता निवडणूक आयोगाला कळले असेल, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस असली आणि नकली हा वाद मोदी यांनी लावून दिला होता, आता मोदींना उत्तर मिळाले आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
शिवसेना व राष्ट्रवादी मधील 40 आमदार पुन्हा माघारी फिरतील असे वडेट्टीवार म्हणाले हे विचारल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, राजकारणात असं बोलणे उचित नाही जे येणार आहेत ते येणारच आहे. अनेक जण आमच्या संपर्कात आहे असेही ते म्हणाले. संविधान बदलणार असा अपप्रचार करून मते मिळवली यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, आम्ही असा प्रचार केला नाही त्यांचेच प्रवक्ते आणि उमेदवार हे सांगत होते, ज्यांना भाजपने उमेदवारी दिली त्यातील दहा-बारा जण सांगत होते की आम्हाला निवडून द्या आम्हाला संविधान बदलायचं आहे, असे पाटील म्हणाले. त्यांच्या मनामध्ये संविधान बदलायचं होते ते आजचे नव्हते ज्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून त्यांचं संविधान बदल्याचा विषय हा सुरू होता आता त्यांना त्यासाठी 400 जागा लागत होत्या आणि तेच ते स्वतःहून सांगत होते असे ते म्हणाले.
राज्य सरकार कायदा सुव्यवस्थेत संदर्भामध्ये अपयशी ठरला आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला. कोयता गॅंगसुद्धा यांना नियंत्रणाखाली आणता येत नाही, असे ते म्हणाले. कशा पद्धतीने प्रशासन काम करते गृह खात्यामध्ये दिसून येते, असेही ते म्हणाले. आत्तापर्यंत कोयता गँगला त्यांनी जेरीला आणायला पाहिजे होतं पण तसं काही घडलेलं नाही. अशा गंभीर घटनांची राज्य सरकारने दखल घेतली पाहिजे. सरकारने उद्घाटनाचे कार्यक्रम बाजूला ठेवून तर वेळ दिला तर निश्चितपणे त्याचा परिणाम दिसून येईल असेही पाटील म्हणाले.