मोदींपेक्षा जास्त मतं आमच्या सुप्रियाला मिळाली!; शरद पवारांचा मस्त चिमटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही माझ्या शेताचा बांध कोरला नाही. पण, त्यांचे धोरण शेतकऱयाला अडचणीत कसे आणता येईल असे होते. पिकवणाऱयांपेक्षा खाणाऱयांचा विचार करणारे होते. त्यांनी अनेक गॅरंटी दिल्या; पण मोदी यांच्यापेक्षा जास्त मते तर आमच्या सुप्रियाला मिळाली. मोदींची गॅरंटी येथे चालली नाही, असा मस्त चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना काढला.

गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार बारामती तालुक्यातील गावांच्या दौऱयावर आहेत. आज त्यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली. लोणी भापकर येथे गावकऱयांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली गॅरंटी फसवी असल्याचे लोकांच्या लक्षात आले. त्यांनी यापूर्वी दिलेली आश्वासने गेल्या दहा वर्षांत पूर्ण केली नाहीत. परिणामी त्यांच्यावरील विश्वास उडाल्याने राज्यात महाविकास आघाडीला लोकसभेत यश मिळाले. राज्यातील 155 विधानसभा क्षेत्रांत आम्ही मताधिक्य मिळविले. येत्या विधानसभेतही त्याची पुनरावृत्ती झालेली दिसेल. आम्ही लोकसभेच्या 31 जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मविआचे सरकार आलेले दिसेल. त्याच्या कामाला आम्ही सुरुवात केली आहे. विधानसभेतही लोकांचा मूड असाच असेल, असा मला विश्वास आहे,’ असे पवार म्हणाले.

दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. दुष्काळ दौऱयामध्ये शेतकऱयांशी संवाद झाला. या दौऱयामुळे लोकांचे सुख-दुःख जाणून घेण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातील इतर जिह्यांतही आपण दौरा करणार आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी काही गोष्टी यामध्ये असून, काही ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे. आता मुख्यमंत्र्यांना बैठक घ्या असे सांगितले असून, मी पह्नवरूनदेखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.

भुजबळांशी संवाद नाही…
गेली काही महिने मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवाय त्यांनी मी राष्ट्रवादीत आहे, अजित पवार यांच्यासोबत नाही, असे वक्तव्य केले होते. यासंबंधी शरद पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ‘त्यांच्या नाराजीची कल्पना नाही. त्याची काय पार्श्वभूमी आहे हे ही माहिती नाही. माझा त्यांच्याशी गेले काही महिने कसलाच संपर्क, संवाद झालेला नाही.’

पुढचा डोस कधी ते मी सांगेन…
बारामतीच्या निवडणुकीत एकही पुढारी दिसत नव्हता; पण मतमोजणी झाली, तेव्हा सगळ्यांना कळले, हाच चमत्कार विधानसभेलाही करायचा आहे. एक चमत्कार तुम्ही करा, एक मी करतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हालचाली करण्याची माझी तयारी आहे. आपल्याला हे सरकार बदलायचे आहे. त्यासाठी पुढचा डोस कधी द्यायचा ते मी सांगेन, अशा शब्दात पवार यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.

केंद्राला बघ्याची भूमिका घेता येणार नाही
राज्यात आरक्षणावरून निर्माण झालेल्या प्रश्नात केंद्राने हस्तक्षेप करावा. आरक्षणाचा प्रश्न केंद्राशी संबंधित आहे. काही दुरुस्त्या केंद्राच्या अखत्यारीतील आहेत, त्यामुळे या प्रश्नात केंद्राला आता बघ्याची भूमिका घेता येणार नाही. राज्यातील सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी जे जे काही करता येईल ते करू, असे शरद पवार म्हणाले.