बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2024 सालच्या हिंसाचार प्रकरणात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे शेख हसीना यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या असून त्यांची बांगलादेशला परतण्याची शक्यता मावळली आहे.

शेख हसीना सरकारविरुद्ध गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये मोठे आंदोलन झाले होते. विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या या आंदोलनात प्रचंड हिंसाचार झाला होता. यावेळी शेख हसीना यांनी निश्चस्त्र नागरिकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले असून कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.

शेख हसीना यांच्यासह माजी गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांनाही 12 लोकांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत त्यांनाही फाशीची शिक्षा सुनावली. तर तिसरे आरोपी आणि सरकारी साक्षीदार बनलेले माजी पोलीस महानिरीक्षक अब्दुल्ला अल-मनून यांना पाच वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली. तसेच कोर्टाने हसीना आणि असदुज्जमां खान कमाल यांची सर्व संपत्ती जप्त केली आहे. सध्या हे दोन्ही नेते बांगलादेशमधून फरार झालेले असून गेल्या 15 महिन्यांपासून त्यांनी हिंदुस्थानमध्ये आश्रय घेतला आहे.

पाच पैकी तीन आरोपात दोषी

दरम्यान, शेख हसीना यांच्या अनुपस्थितीत महिनाभर हा खटला चालला. पाच पैकी तीन आरोपांत त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. हिंसाचाराला प्रवृत्त करणे., आंदोलनांना ठार मारण्याचे आदेश देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनादरम्यान उसळलेला हिंसाचार आणि अत्याचाराला आळा घालण्यात त्यांना अपयश आल्याचे म्हणत तीन सदस्यीय कोर्टाने त्यांना या आरोपांमध्ये दोषी ठरवले. आंदोलकांना मारण्यासाठी प्राणघातक शस्त्र, ड्रोन आणि हेलिकॉप्टरचा वापर करण्याच थेट आदेश हसीना यांनी दिल्याचे न्यायालयाने म्हटले. यावेळी कोर्टाने हसीना यांची एक ऑडियो क्लिपही चालवली. यात हसीना पोलिसांना लोकांवर गोळ्या चालवण्याचे आदेश देत असल्याचे स्पष्ट होत आहे.