कल्याणीनगर चौकात नाकाबंदीदरम्यान अडविलेल्या दुचाकीस्वाराकडून येरवडा वाहतूक विभागातील एका पोलीस उपनिरीक्षकाने तरुणाकडून चक्क पाय दाबून घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे पुण्यात चाललंय काय? असा प्रश्न पडला आहे. व्हायरल व्हिडीओमुळे वाहतूक पोलिसांवर मोठय़ा प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी रात्री वाहनचालकांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. भरधाव वाहन चालविणारे वाहनचालक, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून आता अचानक नाकाबंदी करण्यात येत आहे. त्यानुसार कल्याणीनगर परिसरात शनिवारी रात्री पोलिसांचे पथक वाहनांची तपासणी करीत होते. संबंधित उपनिरीक्षकाची रात्रपाळी होती. त्यांचे पथक मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कल्याणीनगर परिसरात ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ची कारवाई करीत होते. यादरम्यान रात्री घरी परतणारा तरुण पोलीस अधिकाऱ्याचे पाय दाबत असल्याचे चित्रीकरण कारमधील एकाने केले. रविवारी दुपारी सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांनी वाहतूक पोलिसांच्या या प्रकारावर टीका केली. त्यामुळे तरुणाकडून पाय दाबून घेणारा पोलीस अधिकारी कोण, असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर राज्यासह देशभरात कल्याणीनगरचे नाव झाले. त्यातच आता पाय दाबून घेतल्याची घटनादेखील कल्याणीनगर चौकात घडल्याने सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात पोलिसांवर टीका केली जात आहे.
वय 57, सलग 2 दिवस नाईट डय़ुटी
संबंधित उपनिरीक्षक हे येरवडा वाहतूक विभागात कार्यरत आहेत. दोन दिवस रात्री आणि दिवसा डय़ुटी केल्यामुळे त्यांची साखर 550 पर्यंत वाढली. त्यामुळे त्यांच्या पायात ‘व्रॅम्प’ आला आणि ते अचानक जमिनीवर बसले. व्हिडीओमधील तरुण त्यांची मदत करीत होता तरीही आम्ही वस्तुस्थितीची पडताळणी करीत आहोत, असे स्पष्टीकरण वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिले.