मध्यरात्री आगीचं तांडव! 1 हजार घरं जळून खाक; 5 हजारांहून अधिक लोक बेघर, संपूर्ण वस्ती झाली बेचिराख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिलिपिन्समध्ये मंगळवारी रात्री आगीचे तांडव पाहायला मिळाले. दक्षिण फिलिपिन्सच्या बोंगाओ येथील एका छोट्या बेटावर मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या आगीने बघता बघता संपूर्ण वस्तीला आपल्या विळख्यात घेतले आणि 1000 हून अधिक घरे जळून खाक झाले. या भीषण दुर्घटनेमुळे साधारण 5000 लोक बेघर झाले आहेत. ही आग अनेक तास सुरू होती. जोरदार वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले, ज्यामुळे ती वेगाने पसरली आणि परिस्थिती अधिक हाताबाहेर गेली.

पीएनए या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही आग बारंगाय लामियन नावाच्या भागात आधी लागली आणि तिथून संपूर्ण बेटावर पसरली. या बेटारील घरं पाण्यावर लाकडी खांब रचून उभारण्यात आलेली आहेत. बहुतांश घराच्या बांधकामासाठी लाकूड, नारळाच्या झाड्या फांद्या आणि बांबू वापरण्यात आलेले होते. ही घरंही एकमेकांना अगदीच खेटून होती. त्यामुळे आग वेगाने पसरली आणि बघता बघता 1000 घरांचा कोळसा झाला.

आग लागल्याचे कळताच संपूर्ण वस्ती रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र या आगीत संसारोपयोगी वस्तू, वर्षानुवर्षांची मेहनत जळून खाक झाली. या आगीमुळे हजारो लोक बेघर झाले असून मोकळ्या आभाळाखाली आसरा शोधत आहेत.

आगीचे व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, आगीने संपूर्ण वस्ती विळख्यात घेतल्याचे भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आकाशातून ड्रोनच्या माध्यमातून आगीची ही घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये आगीचे आक्राळविक्राळ रूप आणि धुराचे प्रचंड लोट स्पष्ट दिसत आहेत.

चौकशी सुरू

या बेटावरील वस्तीत अत्यंत गरीब कुटुंब वास्तव्यास होती. पाण्यात लाकडी खांब ठोकून ही घरं उभारण्यात आली होती. या ठिकाणी अग्निशमन दलाला पोहोचण्यासाठी धड रस्ताही नाही. त्यामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात अपयश आले. फिलिपिन्समध्ये याआधीही अशा घटना घडलेल्या असून आता घडलेल्या घटनेचीही चौकशीचे आदेश देणअयात आले आहेत. शॉर्ट सर्किट किंवा गॅसगळतीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र याबाबत अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.