देश विदेश – जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी

ओव्हरसीज बँकेचा ग्राहकांना दिलासा 

भारतीय ओव्हरसीज बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेतील बचत खात्यावर मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. जर खात्यावर ठरावीक रक्कम नसेल तर बँकेकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही. आधी ही सूट काही मोजक्या स्कीम्सवर होती, परंतु आता सर्व खात्यांवर सूट दिली आहे, अशी माहिती बँकेचे एमडी आणि सीईओ अजय कुमार श्रीवास्तव यांनी दिली. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जुने नियम लागू राहतील. या काळात ग्राहकांना दंड द्यावा लागणार आहे.

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, 9 ठार

पाकिस्तानच्या पेशावर शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात 9 लोकांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हा स्फोट खास करून पोलीस आणि सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला. पाकिस्तानात याआधी 30 सप्टेंबरला बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्ये फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयासमोरील रस्त्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 10 जण ठार, तर 32 जण जखमी झाले होते.

राहुल गांधींकडून हिंदुस्थानी बाइक्सचे कोलंबियात कौतुक

दक्षिण अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुस्थानी बाइक्सचे कोलंबियात कौतुक केले. हिंदुस्थानी दुचाकी कंपनी बजाज, हिरो आणि टीव्हीएस बाइक्सचे तोंडभरून कौतुक केले. हिंदुस्थानी कंपन्यांनी स्वतःच्या हिमतीवर जगात आपले नाव उज्ज्वल केले आहे, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी कोलंबियाच्या रस्त्यावर बजाज पल्सर बाइकसमोर उभे राहत एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना राहुल म्हणाले की, टीव्हीएस, बजाज आणि हिरो कंपनीच्या बाइकला कोलंबियात चांगली मागणी आहे हे पाहून अभिमान वाटत आहे, असे म्हटले आहे.

जगभरात महात्मा गांधींना जयंतीदिनी अभिवादन

महात्मा गांधींना 2 ऑक्टोबर गांधी जयंतीदिनी जगभरात अभिवादन करण्यात आले. रशिया, चीन, पाकिस्तानसह अन्य देशांत गांधी जयंती साजरी करण्यात आली. 156 व्या गांधी जयंतीनिमित्त रशियात मॉस्कोतील रामेनकी रेयान पार्कात महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. बीजिंगमध्ये भारतीय दूतावासाने जिंताई कला संग्रहालयात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा करण्यात आला.