ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे गुरुवारी 3 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्याला लागून असलेल्या इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून कुत्रा अंगावर पडल्याने मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाला अटक केली आहे. जैद सय्यद (24) असे आरोपीचे नाव आहे.
अपघात झाल्याच्या दोन दिवसांनंतर या प्रकरणाबाबत तक्रार नोंदवण्यात आल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले. यानंतर या अपघाताची चौकशी करत असताना काही गोष्टी तपासात समोर आल्या. कुत्र्याला टॅरेसला बांधून ठेवले होते. मात्र स्वत:ला सोडवण्याच्या प्रयत्नात कुत्रा इमारतीवरून खाली कोसळला आणि तो रस्त्यावरून जात असलेल्या 3 वर्षांच्या चिमुकलीच्या अंगावर पडला. या घटनेत त्या चिमुकलीचा मृत्यू झाला. त्या कुत्र्यालाही दुखापत झाल्याने त्याला उपाचारासाठी नेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंब्रामधील प्रकरणात कुत्र्याला इमारतीवरून फेकले आहे. तसेच मृत मुलीच्या कुटुंबाला पोलिसात तक्रार न करण्याची धमकी दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. आव्हाड कुटुंबासह पोलिस ठाण्यात आले. यावेळी आव्हाड यांनी पोलिसांना या प्रकरणात सध्याच्या एफआयआरमध्ये आणखी तीन नावे जोडण्याची विनंती केली. अन्य आरोपींची नावे आणि ओळख पोलिसांनी उघड केलेली नाही.