सिंधूची उपांत्य फेरीत झेप, यामागुचीने दुखापतीमुळे सामना अर्ध्यावरच सोडला

हिंदुस्थानची दिग्गज बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या नव्या हंगामाची जोरदार सुरुवात करत मलेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. क्वालालंपूर येथील ऑक्सियाटा अरेनात झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत जपानच्या अकाने यामागुचीने दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर सिंधूला विजय मिळाला.

डिसेंबर 2024 मध्ये सय्यद मोदी इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेतील विजयानंतर कोणतीही स्पर्धा न जिंकलेल्या सिंधूने या हंगामातील पहिल्याच सुपर 1000 दर्जाच्या स्पर्धेत आपली लय आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दाखवून दिला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधूने आक्रमक खेळ करत पहिला गेम अवघ्या 21-11 असा सहज जिंकला.

तीन वेळची विश्वविजेती आणि तिसऱया मानांकित यामागुची गुडघ्याला पट्टी बांधून खेळत होती. पहिला गेम गमावल्यानंतर दुखापतीचा त्रास वाढल्याने तिने सामना पुढे न खेळण्याचा निर्णय घेतला. परिणामी सिंधूचा विजय निश्चित झाला. या निकालामुळे यामागुचीविरुद्ध सिंधूचा एकूण जय-पराजयाचा आकडा 15-12 असा झाला आहे.

दीर्घ विश्रांतीनंतर स्पर्धात्मक बॅडमिंटनमध्ये पुनरागमन करत असलेल्या सिंधूची कामगिरी आत्मविश्वासवर्धक ठरत असून तिची फॉर्ममध्ये होत असलेली वाढ आगामी लढतींसाठी दिलासादायक आहे. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना चीनच्या दुसऱया मानांकित वांग झीयी आणि इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित पुत्री कुसुमा वारदानी यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्यातील विजेतीशी होणार आहे.

सात्त्विक-चिराग जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव

पुरुष दुहेरीत हिंदुस्थानची अव्वल जोडी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. इंडोनेशियाच्या फजर आल्फियन आणि मोहम्मद शोहिबुल फिक्री या अनुभवी जोडीने सात्त्विक-चिराग यांना सरळ गेममध्ये पराभूत केले.