Pahalgam Terror Attack – ‘कलमा म्हणा…मग आम्ही तुम्हाला गोळी मारणार नाही, सांगत धर्मांध दहशतवाद्यांनी शुभमला गोळ्या घातल्या

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले, तर 20 जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म आणि नाव विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या भयानक हल्ल्यात कानपूर येथील शुभम द्विवेदीचाही मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी त्याच्या पत्नीसमोर त्याला गोळ्या घातल्या. त्याला मारण्यापूर्वी दहशतवाद्यांनी शुभमला त्याच्या धर्माबद्दल विचारले आणि त्याला कलमा म्हणण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिल्याने दहशतवाद्यांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभमचे लग्न दोन महिन्यांपूर्वी झाले होते. तो त्याच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांसाठी काश्मीरला गेला होता, अशी माहिती त्याचा भाऊ सौरभने दिली आहे. शुभम हा सिमेंटचा व्यापारी होता. 17 एप्रिल रोजी तो त्याची पत्नी एशान्या, कुटुंब आणि नातेवाईकांसह जम्मू आणि काश्मीरला गेला होता. पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शुभमला गोळी लागली आहे, अशी माहिती सौरभला फोनवरून मिळाली. या घटनेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला, अशी माहिती सौरभने दिली.

‘कलमा म्हणा आणि आम्ही तुम्हाला गोळी मारणार नाही’

दरम्यान, सौरभला सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडिओ दिसला. यामध्ये शुभमचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला होता. त्याच्या डोक्यावर गोळी लागली होती.. हे हृदयद्रावक व्हिडीओ पाहिल्यानंतर सौरभने शुभमची पत्नी एशान्याला फोन केला. यावेळी ती घाबरली होती आणि रडत होती. एशान्याने सौरभला सांगितले की, आम्ही घोडेस्वारी करत होतो, त्याचवेळी दहशतवादी हल्ला झाला. एका दहशतवाद्याने शुभमला सांगितले की जर त्याने कलमाचे पठण केले तर तो त्याला गोळी घालणार नाही, असे ते म्हणाले. शुभमने नकार देताच त्यांनी शुभमला गोळी मारली. यानंतर आम्ही तुम्हाला सोडून जात आहोत जेणेकरून तुम्ही तुमच्या सरकारला सांगू शकाल,असे म्हणून त्यांनी मला सोडून दिले, असे तिने सौरभला सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, शुभमचा मृतदेह कानपूरला पोहोचण्यासाठी 2 दिवस लागतील अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली.