Pahalgam Terror Attack –  डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तीन मावस भावंडांचा दुर्दैवी मृत्यू, शहरात  शोककळा

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवी बळी गेलेल्या 26 पर्यटकांत डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती रात्री उशिरा हाती आली. हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने अशी या तिघांची नावे असून त्यांच्या दुर्दैवी मृत्यूचे वृत्त कळताच डोंबिवली शहरावर  शोककळा पसरली आहे. हे तिघेही मावसभावंडे असल्याचे कळते.
डोंबिवली पूर्व-पश्चिम शहरातील नवापाडा, पांडुरंगवाडी आणि नांदिवली परिसरातील रहिवासी असलेले हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने हे तिघेही पर्यटनासाठी कश्मीरला गेले होते.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. या गोळीबारात हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे डोंबिवलीत हळहळ व्यक्त केली जात असून लेले, मोने आणि जोशी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे.

नौदल आणि आयबी  अधिकाऱयाचा मृत्यू

या हल्ल्यात आयबी अधिकारी मनीष रंजन यांना कुटुंबासमोरच गोळ्या घालून मारण्यात आले. मनीष हे मूळचे बिहारचे असून कुटुंबासोबत ते कश्मीरमध्ये फिरायला गेले होते. हल्ल्यात नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही मृत्यू झाला. 16 एप्रिलला त्यांचे लग्न झाले होते.

मोदींना डोक्यावर चढवलंय म्हणत गोळीबार

तुम्ही मोदींना डोक्यावर चढवून ठेवलंय. तुमच्यामुळे मोदी मोठे झालेत. तुम्ही आम्हाला बदनाम केलंय. आमच्या धर्माला बदनाम व्हावं लागत आहे. आम्ही कधी महिलांना मारतो का? मग तसं का बदनाम करता? असं दहशतवादी आम्हाला म्हणाले. त्यांनी माझ्या वडिलांना पकडलं आणि मुस्लिम असाल तर अजान वाचा, असे म्हणाले. त्यानंतर  त्यांनी अनेक पुरुषांना तसे करायला लावले आणि नंतर त्यांनी गोळ्या घातल्या, अशी आपबिती पुण्यातील आसावरी जगदाळे यांनी सांगितली. माझ्या डोळ्यासमोरच वडिलांना आणि काकांना गोळ्या घातल्या. त्यावेळी एकही सुरक्षा रक्षक तिथे नव्हता, असे त्या म्हणाल्या. हल्ल्यात संतोष जगदाळे यांच्यासह प्रगती जगदाळे, काwस्तुभ गनबोटे, संगीता गनबोटे हे गंभीर जखमी झाले.

नववधूने पतीला गमावले

मधुचंद्रासाठी जम्मू-कश्मीरला गेलेल्या शुभम आणि ऐश्वर्या या दाम्पत्यापैकी शुभम यांचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाशेजारी खिन्न मनाने बसलेल्या, हिरवा चुडा घातलेल्या नववधू ऐश्वर्याचे पह्टो, व्हिडीओ समोर आले असून तिला पाहून स्थानिक नागरिक तसेच संपूर्ण देशातील नागरिकांच्या काळजात धस्स झाले. दहशतवाद्यांनी शुभमला केवळ मुस्लिम नसल्याचे सांगितल्यामुळे गोळय़ा घातल्याचे ऐश्वर्याने सांगितले. शुभमला वाचवण्यासाठी तिने मदतीचा धावा केला; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी ती खिन्न मनाने पतीच्या मृतदेहाशेजारीच बसून राहिली.