पैठणचे सरकारी वकील सुतार ‘अँटी करप्शन’ च्या जाळ्यात

26

सामना प्रतिनिधी । पैठण

पैठणचे सरकारी वकील सुतार हे ‘अँटी करप्शन’ च्या जाळ्यात अडकले आहेत. १५ दिवसांपूर्वी थेट न्यायालयातील सरकारी वकिलांच्या दालनात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ट्रॅप लावला होता. या वकिलाने ९ हजार रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा गुरूवारी दाखल केला असून, आरोपी वकील मात्र ‘ट्रॅप’ लावल्यापासून फरार आहेत, हे विशेष! दरम्यान, या प्रकारामुळे विधिक्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सरकारी वकिलाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई झाल्याचे वृत्त कळताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत गेल्या १५ दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा होत होती. ‘पैठणच्या कोर्टात अ‍ॅण्टी करप्शनची धाड पडली’ असे या चर्चेचे स्वरूप होते. दरम्यान, त्याचा आज उलगडा झाला. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने थेट पैठण तालुका न्यायालयाच्या इमारतीत असलेल्या सरकारी वकिलाच्या दालनात ही कारवाई केली होती. त्यात तब्बल १५ दिवसांनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश केशव ढोकरट यांनी पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आज गुरुवारी सायंकाळी ५ वाजता सरकारी वकील सुतार यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैठण तालुका न्यायालयाचे सरकारी वकील सुतार यांनी तक्रारदार आबासाहेब धर्मे (रा. बिडकीन, ता.पैठण) यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये माननीय पैठण न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरुद्ध वरच्या न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी तसेच निकालाच्या नकला काढण्यासाठी आबासाहेब धर्मे यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती ९ हजार रुपयांत सौदा ठरला व लाचेची रक्कमही स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. परंतु या ट्रँपच्या दरम्यान आरोपी सरकारी वकील मात्र पसार झाल्याचे अँटी करप्शनच्या पथकाचे म्हणणे आहे.

त्यामुळे सरकारी वकील सुतार याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक गणेश ढोकरट हे करीत आहेत. प्रकरणामुळे विधिक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सुतार हे ११ ऑक्टोबर पासून फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या