आधीच पराभवाच्या गर्तेत असलेल्या पाकिस्तानी क्रिकेटवर रावळपिंडीत बांगलादेशने हल्ला चढवला. 23 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात बांगलादेशने पाकिस्तानवर आपला पहिलावहिला विजय नोंदविताना दहा विकेटनी संस्मरणीय विजय मिळविला. पहिल्या डावात 191 धावांची (341 चेंडूंत 1 षटकार, 22 चौकार) मॅरेथॉन खेळी करीत पाकिस्तानवर बाजी उलटवणारा अनुभवी फलंदाज मुशफिकर रहिम पाकिस्तानसाठी बेरहम ठरला. त्याने आपल्या धीरोदात्त फलंदाजीत पाकिस्तानी गोलंदाजांवर जराही दयामाया दाखवली नाही. त्यामुळे बांगलादेशला अनपेक्षितपणे 107 धावांची निर्णायक आघाडी मिळवता आणि त्यानंतर पाकिस्तानचा दुसरा डाव 146 धावांत गुंडाळत ऐतिहासिक विजयाची मुहूर्तमेढ रोवली. या विजयामुळे पाहुण्या बांगलादेशने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर यजमान पाकिस्तानने ही माती खाल्ली. 6 बाद 448 धावसंख्येवर पहिला डाव घोषित करण्याचा जुगार पाकिस्तानच्या चांगलाच अंगलट आला. कारण मोहम्मद रिझवान 171 धावांवर खेळत असताना त्याचे द्विशतक पूर्ण होऊ न देता डाव घोषित केल्याने कर्णधार शान मसूदच्या या निर्णयावर चौफेर टीका झाली. शिवाय नंतर त्यांच्या गोलंदाजांनाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. बांगलादेशने 565 धावसंख्या उभारून पहिल्या डावात 117 धावांची आघाडी घेत पाकिस्तानची चांगलीच जिरवली. मग बांगलादेशने दुसऱया डावात पाकिस्तानला अखेरच्या दिवशी 146 धावांवर गुंडाळण्याचा पराक्रम केला. त्यानंतर विजयासाठी आवश्यक 30 धावा एकही विकेट न गमावता पूर्ण करीत पाहुण्या बांगलादेश संघाने ऐतिहासिक विजयावर रुबाबात शिक्कामोर्तब केले. उभय संघांत आतापर्यंत 14 कसोटी सामने झाले. यापैकी पाकिस्तानने 12 सामने जिंकले, एक सामना अनिर्णित सुटला, तर रावळपिंडी कसोटी बांगलादेशाने जिंकत नवा इतिहास घडविला.
पाकिस्तानकडून पहिल्या डावात मोहम्मद रिझवानने 239चेंडूंत 3 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 171 धावा केल्या. सौद शकीलने 141 धावांची संयमी खेळी करताना 261 चेंडूंत 9 चौकार लगावले. सॅम अयुबने 56 धावांचे योगदान दिले. स्टार फलंदाज बाबर आझम काही विशेष करू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. दुसऱया डावात त्याला केवळ 22 धावा करता आल्या. याचबरोबर मुशफिपूरसह शादमन इस्लाम (93), मेहेदी हसन मिराझ (77), लिटन दास (56) आणि मोमिनूल हक (50) या चौघांनी केलेल्या अर्धशतकांमुळे बांगलादेशने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली.
बांगलादेशने घेतली पाकिस्तानची फिरकी
पहिल्या डावात शतकी आघाडी घेतल्यामुळे मनोबल उंचावलेल्या बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजांनी दुसऱया डावात पाकिस्तानी फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतली. मेहेदी हसन मिराझने 4, तर शाकिब अल हसनने 3 फलंदाज बाद केले. परिणामी पाकिस्तान संघ 55.5 षटकांत 146 धावांवर गारद झाला. या डावातही मोहम्मद रिझवानने (51 धावा, 80 चेंडू, 6 चौकार) सर्वाधिक धावा केल्या. उर्वरित फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकले नाहीत. त्यानंतर विजयासाठी मिळालेले 30 धावांचे किरकोळ लक्ष्य बांगलादेशने 6.3 षटकांत एकही विकेट न गमावता सहज गाठले. झाकिर हसन (नाबाद 15) आणि शादमन इस्लाम (नाबाद 9) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. दुसरा कसोटी सामना रावळपिंडी येथेच होणार आहे.