इराणवर इतकं प्रेम असेल तर तिथेच जा! पाक लष्करप्रमुख मुनीर यांचा शिया मुस्लिमांना देश सोडण्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि इस्रायल-अमेरिका युद्धामुळे जगभरात तणावाचे वातावरण आहे. अशातच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसीम मुनीर त्यांनी केलेल्या एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका इफ्तार पार्टीदरम्यान शिया धर्मगुरुंशी संवाद साधताना मुनीर यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली. “जर तुम्हाला इराण इतकाच आवडत असेल, तर तिथेच निघून जा; कोणत्याही दुसऱ्या देशाप्रती असलेल्या निष्ठेमुळे आम्ही पाकिस्तानात गोंधळ किंवा अराजकता पसरवू देणार नाही,” असे विधान मुनीर यांनी केल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या विधानामुळे पाकिस्तानमधील शिया मुस्लिमांमध्ये तीव्र संतपाची लाट उसळली आहे.

मुनीर यांच्या या विधानाला शिया मुस्लिमांच्या नेत्यांनी विरोध केला आहे. नेते सय्यद जवाद नदवी यांनी यावर कडक शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. यावेळी ते म्हणाले की, अशा प्रकारची विधाने देशात जातीय तेढ निर्माण करणारी आहेत. शिया समुदायाने लष्करप्रमुखांच्या या भूमिकेचा निषेध केला असून, हे विधान अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. लष्करप्रमुखांनी एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केल्यामुळे देशभरातील शिया अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

या वादावर आपली बाजू मांडताना शिया नेत्यांनी ऐतिहासिक संदर्भांची आठवण करून दिली आहे. पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये आणि जडणघडणीत शिया समुदायाचे अत्यंत महत्त्वाचे योगदान राहिले आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आपली निष्ठा केवळ पाकिस्तानशीच असून, केवळ धार्मिक समानतेमुळे आम्हाला दुसऱ्या देशाशी जोडून आमच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे, अशी भावना समुदायाकडून व्यक्त होत आहे. कोणत्याही समुदायाला अशा प्रकारे परकीय देशाचे हस्तक ठरवणे हा त्यांच्या बलिदानाचा अपमान असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.

सध्या या विधानानंतर पाकिस्तानातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. लष्करप्रमुखांच्या या भूमिकेमुळे शिया समुदायावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका होत आहे. “देशभक्तीची व्याख्या आता सत्तेतील लोक आपल्या सोयीनुसार ठरवत आहेत,” असा सूर सामान्य जनतेतून उमटत आहे. या प्रकरणाने पाकिस्तानातील अंतर्गत यादवी आणि जातीय भेदाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, येणाऱ्या काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.