पाकिस्तानी लष्करप्रमुख दोन महिन्यात दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर, ‘टॅरिफ वॉर’च्या पार्श्वभूमीवर भेटीकडे सगळ्यांचे लक्ष

पाकिस्तानी माध्यमांच्या माहितीनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर हे दोन महिन्यांत दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होत असल्याचे संकेत या दौऱ्यातून मिळत आहेत. विशेषतः, हिंदुस्थान आणि अमेरिकेमधील ‘टॅरिफ वॉर’च्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हिंदुस्थानच्या रशियन तेल खरेदीविरोधात पाऊल उचलत हिंदुस्थानच्या निर्यातीवर 25 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. परिणामी, हिंदुस्थानकडून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवरील एकूण शुल्क 50 टक्क्यांवर पोहोचले आहे. यावर हिंदुस्थानने तीव्र प्रतिक्रिया देत हा निर्णय ‘अन्यायकारक, असमर्थनीय आणि अवास्तव’ असल्याचे म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, हिंदुस्थानची ऊर्जा धोरणे 1.4 अब्ज नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आखली जातात आणि बाजारातील मूल्यांवर आधारित निर्णय घेतले जातात. त्यामुळे, अशा कृतींसाठी फक्त हिंदुस्थानला लक्ष्य करणे हे निषेधार्ह आहे, असे हिंदुस्थानचे मत आहे.

दरम्यान, पाकिस्तानसोबत अमेरिकेचे व्यापारी संबंध अधिक बळकट होत असल्याचे संकेत मिळत असून, ट्रम्प यांनी पाकिस्तानला व्यापार सवलतीसह प्राधान्य शुल्क दर आणि तेलसाठ्यांच्या शोधासाठी योजना प्रस्तावित केल्या आहेत.

याआधी, जून महिन्यात फील्ड मार्शल मुनीर यांनी अमेरिका दौरा केला होता. त्या दौऱ्यात ट्रम्प यांनी त्यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये खास स्नेहभोजनही आयोजित केले होते. त्यावेळीच मुनीर यांनी पुन्हा अमेरिकेत येण्याचा संकेत दिला होता, अशी माहिती ‘डॉन’ वृत्तपत्राने दिली आहे.

मुनीर यांचा आगामी दौरा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे (CENTCOM) प्रमुख जनरल मायकेल एरिक कुरिल्ला यांनी जुलैमध्ये पाकिस्तानला दिलेल्या भेटीनंतर निश्चित करण्यात आला. या भेटीत पाकिस्तान सरकारकडून कुरिल्ला यांना ‘निशान-ए-इम्तियाज (सैनिकी)’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला.

दरम्यान, जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाची प्रत्युत्तरात्मक मोहीम राबवली होती. ट्रम्प यांनी आपल्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात युद्ध टळल्याचा दावा केला, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो स्पष्ट शब्दांत फेटाळला. संसदेतील चर्चेत त्यांनी स्पष्ट केले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्याचा आदेश कोणत्याही जागतिक नेत्याकडून मिळालेला नाही.

या वक्तव्याच्या काही दिवसातच अमेरिका सरकारकडून हिंदुस्थानावरील शुल्कवाढ जाहीर करण्यात आली.