सामोशाच्या किंमतीत मिळतंय पाकिस्तान-बांगलादेश मॅचचं तिकीट, सोशल मीडियावर PCB ट्रोल

पाकिस्तानचा क्रिकेट टीम 16 महिन्यांनंतर घरच्या मैदानावर टेस्ट सिरीज खेळणार आहे. पाकिस्तानची टीम बांगलादेश विरोधात दोन टेस्ट मॅच खेळाणार आहे. सीरीजची पहिली टेस्ट मॅच 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही टेस्ट रावळपिंडीमध्ये खेळली जाणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी)ने स्टेडियममध्ये प्रेक्षकांची संख्या वाढविण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. पाकिस्तान-बांगलादेश मॅचच्या तिकीटाची किंमत फक्त 15 रुपये ठेवली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डद्वारा जारी केलेल्या लिस्टमध्ये तिकिटांची किंमत पाकिस्तानी रुपयांनुसार 50 रुपये आहे. म्हणजे हिंदुस्थानचे 15 रुपये होतात. एखाद्या चाहत्याला पाचही दिवस मॅचचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला पाकिस्तानी 215 रुपये ( हिंदुस्थानी 72 रुपये) द्यावे लागतील. सगळ्यात महागडे तिकीट संपूर्ण हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये हिंदुस्थानी रुपयांनुसार 83 हजार 333 म्हणजेच पाकिस्तानचे 2 लाख 50 हजार रुपये आहे. याशिवाय तिकिटांवर रिफंड आणि डिस्काउंटचीही सुविधा आहे.

पाचही दिवसांचे एकसाथ तिकिट घ्यायचे असल्यास त्यावर 15 टक्के सुट दिली जाते. शिवाय टेस्ट मॅच लवकर संपल्यास बाकीच्या दिवसांचे पैसे परत केले जाणार आहेत. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. एवढ्या किंमतीत एक समोसा येईल. तर काही चाहत्यांच्या म्हणण्यानुसार पीसीबीने मोफत तिकीट वाटायला हवे होते. पाकिस्तान-बांगलादेश सीरीजची सुरुवात 21 ऑगस्टला रावळपिंडीतील टेस्टने होणार आहे. तर दुसरी टेस्ट 30 ऑगस्टपासून कराचीमध्ये खेळला जाईल.