
2025 मध्ये पाकिस्तान देश हा जगातील सर्वात जास्त प्रदूषित देश बनला आहे, अशी माहिती स्वित्झर्लंडच्या एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग कंपनी आक्यूएअरच्या अहवालातून समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये पीएम2.5 म्हणजेच खूपच छोटे आणि धोकादायक कणाचा स्तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपेक्षा 13 पट जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, पीएम2.5 चा सुरक्षित स्तर 5 मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर असायला हवा. परंतु पाकिस्तानचा हा स्तर 13 पट जास्त आहे. यामुळे हे कण शरीरात जाऊन थेट हृदय आणि फुप्फुसांवर परिणाम करतात.
गुजरातमध्ये पेट्रोल कंप बंद झाल्याची अफवा
पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याने गुजरातमधील अहमदाबाद सह अनेक शहरांमध्ये पेट्रोल कंप बंद होणार आहे, अशी अफवा पसरली. या अफवेमुळे शेकडो वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर धाव घेत एकच गर्दी केली. यामुळे अहमदाबाद, सूरत, वडोदरा, राजकोटसह अन्य शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सरकार राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची उपलब्धता सुनिच्छित करण्यासाठी व्यवस्था करत आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी जनतेला केले आहे.
हरियाणात भरधाव कंटेनरने 7 जणांना चिरडले
हरियाणात भरधाव कंटेनरने सात जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना झज्जर येथे घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एका महिलेसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव आलेल्या कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्या दोन तरुणांना चिरडले. त्यानंतर आणखी काही लोकांना चिरडले. यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर धडकेत ऑटोमधील महिलेसह चार जण जखमी झाले. कंटेनर चालवणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर विजेच्या दोन खांबामध्ये जाऊन अडकला. चालक उडी मारून पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमी झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


























































