सिंधू कराराबाबत पुर्नविचार करावा, पाकिस्तानची हिंदुस्थानकडे याचना

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊले उचलली. सर्वात आधी हिंदुस्थानने सिंधू जल कराराला स्थगिती देत पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केला. पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकत नाही, असा इशारा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. हिंदुस्थानकडून पाणी कोंडी झाल्यामुळे पाकिस्तानची सध्या तडफड सुरू आहे. त्यामुळे अखेर बुधवारी पाकिस्तानने हिंदुस्थानकडे सिंधू जल करार स्थगितीवर पुर्नविचार करावा अशी याचिकाच केली असल्याचे सूत्रांकडून समजते. पाकिस्तानच्या मंत्रालयाने हिंदुस्थान सरकारला तशी याचना करणारे पत्र पाठवले आहे.

सिंधू जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तानातील अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती अडचणीत सापडली आहे. तसेच पाकिस्तानात पाणी संकट निर्माण झाले आहे. सिंधू नदीमुळे पाकिस्तानातील 17 कोटी लोकसंख्येला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हिंदुस्थानने चिनाब नदीचे पाणी देखील थांबवले आहे. आधी सिंधू करार रद्द मग चिनाब नदीचे पाणी थांबवल्यामुळे पाकिस्तानची अजूनच कोंडी झाली आहे.

तसेच हिंदुस्थानने पाकिस्तान सीमेवर असलेली सलाल आणि बाघलियार धरणे बंद केली. पाकिस्तानला या धरणातून पाणी मिळत होते. याचा वापर पिण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी केला जात होता.

जागतिक बँकेचा हस्तक्षेपास नकार

सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेला याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती पाकिस्तानने केली होती. पाकिस्तानच्या या मागणीला जागतिक बँकेने केराची टोपली दाखवली होती. जागतिक बँकेला या कराराशी काहीही देणेघेणे नसून यात बँकेची मध्यस्थाची भूमिकाही नाही, अशा स्पष्ट शब्दांत जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी सिंधू जल करारात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.