Iran US Israel War – भिकेला लागलेल्या पाकिस्तानात इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 450 रुपये, तर डिझेल 500 रुपये लीटर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य पूर्वेतील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पाकिस्तान सरकारने गुरुवारी इंधनाच्या दरात मोठी वाढ करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानने पेट्रोलच्या किमतीत तब्बल 137.24 रुपये आणि डिझेलच्या किमतीत 184.49 रुपयांची दरवाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.

मध्य पूर्वेतील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने पाकिस्तान सरकारने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. महिन्याभरातील ही दुसरी दरवाढ असून यामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या पाकिस्तानी जनतेचे कंबरडे मोडले आहे.

पाकिस्तान सरकारने डिझेलच्या किमतीत 54.9 टक्क्यांची वाढ केली असून आता डिझेल 520.35 रुपये प्रति लीटर झाले आहे. तसेच, पेट्रोलच्या किमतीत 42.7 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून नवे दर 458.40 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. तर केरोसीन अर्थात घासलेटच्या दरामध्ये 34.08 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक लीटर केरोसीनची किंमत 457.80 रुपये झाली आहे. हे सुधारित दर शुक्रवारपासून लागू होणार आहेत. पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

अमेरिका-इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. अशा परिस्थितीत देशांतर्गत दरवाढ करणे अपरिहार्य होते. गेल्या तीन आठवड्यांत सरकारने 129 अब्ज रुपयांचे अनुदान दिले, परंतु मर्यादित संसाधनांमुळे हे अनुदान कायम ठेवणे आता आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक म्हणाले.

दरम्यान, दुचाकी वापरकर्त्यांना दरमहा 20 लीटरपर्यंत, प्रति लीटर 100 रुपयांचे अनुदान दिले जाईल. ही सवलत पुढील तीन महिन्यांसाठी असणार आहे. तसेच देशाच्या जीडीपीमध्ये 24 टक्के वाटा असलेल्या कृषी क्षेत्राला आधार देण्यासाठी लहान शेतकऱ्यांना प्रति एकर 1500 रुपयांचे एकवेळचे अनुदान दिले जाईल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.