
पहलगाममधील हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी घेऊन माता भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानला हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, परंतु पाकिस्तानने आता हेच दहशतवादी तळ पुन्हा सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यांचे पुनर्बांधकाम, देखभाल आणि दुरुस्तीसाठी पाकिस्तान सरकारने तब्बल 100 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे. यावरून पाकिस्तानच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा पुरावाच समोर आला आहे.
सैनिकांच्या घर योजनेचा निधी दहशतवाद्यांसाठी वळवला
नऊ दहशतवादी तळांसाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी वेगळा ठेवण्यात आला आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या निधीत आणखी वाढ करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख आसिम मुनीर यांनीच सर्वात आधी पावले उचलल्याचे समोर आले आहे. मुनीर यांनी पाकिस्तानी सैन्य कल्याण आणि सैन्य घर योजनेतून बराचसा निधी दहशतवादी तळांच्या उभारणीसाठी वळता केल्याचेही सांगितले जात आहे.
चिनी कंपनीशी संपर्क
पाकिस्तान सरकारने दहशतवादी तळांचे पुनर्निर्माण, देखभाल आणि दुरुस्तीसाठी चीनच्या गेझोउबा ग्रुप कंपनीशी संपर्क केला. ही कंपनी आधीपासूनच पाकिस्तान व्याप्त कश्मीरसाठी काम करत आहे. मुजफ्फराबाद, कोटली आणि भिंबर येथील काही ठिकाणी ही कंपनी काम सुरू करू शकते.
मुनीर यांचे जैश, लश्कर ए तोयबा प्रेम
पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख आसिम मुनीर यांचे जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांवरचे प्रेमही लपून राहिलेले नाही. जैशचे मुख्यालय बलावलपूर येथे सुभान अल्लाह मशिदीचा देखभाल आणि दुरुस्तीचा अहवाल थेट मुनीर यांच्याकडे जातो. जैशचा सुप्रीमो मसूद अजहर यालाही आयएसआयच्या स्पेशल सेफ हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे.